राज्यात निर्मिती व वितरण होणाऱ्या देशी-विदेशी दारुच्या बाटल्यांवर होलोग्राम बसविण्याची सक्ती एक जुलैपासून केली जाणार आहे. त्यामुळे कर चुकवून आणलेल्या परराज्यातील मद्याला आणि बनावट मद्याला आळा बसेल आणि राज्य सरकारला तीन हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळेल, असे उत्पादन शुल्क मंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले. मोफत ‘मोबाईल अ‍ॅप’ च्या माध्यमातून कोणीही मद्याच्या बाटलीची तपासणी केल्यास ते बनावट आहे की अस्सल आहे, याची माहिती उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकांनी मद्य पिऊ नये, हेच सरकारचे मत असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले. मात्र बिहार आणि अन्य काही राज्यांमध्ये संपूर्ण दारुबंदीच्या घोषणा झाल्या असताना महाराष्ट्रात मात्र तसा प्रस्ताव नसल्याचे खडसे यांनी सांगितले.