करोनाच्या सावटामुळे यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाचे रूप जसे बदलले तसेच घरगुती गणेशोत्सवाचेही स्वरूपही बदलले आहे. अनेकांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. कमी उंचीची शाडूची मूर्ती, नातेवाईकांना ऑनलाइन दर्शन आणि घरीच विसर्जन अशा उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

मोठमोठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे मूर्तीची उंची कमी करायची नाही म्हणून हट्टाला पेटलेली असताना समंजस भक्तांनी मात्र घरगुती मूर्तीची उंची काही इंचांनी कमी केली आहे. दहिसरच्या आतिश म्हात्रे यांनी यंदा मूर्तीच आणायची नाही, असे ठरवले होते. पण १५ वे वर्ष कोरडे जायला नको, म्हणून दरवर्षीपेक्षा लहान शाडूची मूर्ती आणायचा निर्णय त्यांनी घेतला. गरजू मूर्तीकाराकडूनच मूर्ती खरेदी केली. ‘रोज आपण मनोभावे देव्हाऱ्यातल्या देवाची पूजा करतोच ना, मग गणपतीची पूजा करायला भटजीच कशाला हवा,’ असा विचार करून त्यांनी भटजीला बोलावणे टाळले. घरात उपलब्ध साहित्यातून साधी सजावट केली जाणार आहे. नातेवाईकांना फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून दर्शन दिले जाणार आहे.

बोरिवलीच्या सायली शिरूर यांच्या घरी दरवर्षी शाडूचीच मूर्ती असते. यंदा कृत्रिम तलावात विसर्जन केले जाणार आहे. तिथे गर्दी झाली तर घरच्या घरी टपात विसर्जन करता यावे यासाठी लवकर विरघळेल, अशी लहान मूर्ती आणण्याचा निर्णय त्यांनी घेतला. नातेवाईक घरी येणार नसल्याने त्यांच्यासोबत झूमवर आरती केली जाईल, फराळही कमी प्रमाणात केला जाईल. शेजाऱ्यांना जेवायला घरी न बोलवता त्यांच्या घरी काही पदार्थ पोहोचवले जातील, असे त्यांनी सांगितले.

बदलापूरच्या जयश्री नाईक यांनी लाल माती आणि पालापाचोळा यांपासून घरीच मूर्ती साकारली आहे. ‘सध्या बाहेरील वातावरण नैराश्याचे आहे. अशावेळी गणेशोत्सवाची सजावट करण्यात मन गुंतून राहिल्यामुळे संपूर्ण महिना आनंदात गेला. यंदा गणपतीच्या दर्शनाला नातेवाईक येणार नाहीत. जे स्वत:हून विचारणा करतात त्यांना एके काने या, समूहाने येऊ नका, असे सांगितले आहे. कमी माणसांमध्ये, साधेपणाने भजन होईल.

गेली पाच वर्षे शाडू मातीचीच मूर्ती आणतो आणि कृ त्रिम तलावात विसर्जन करतो. पण यंदा गच्चीवर पिंपात मूर्तीचे विसर्जन होईल. काही दिवस ते झाकू न ठेवल्यानंतर मातीमिश्रित पाणी झाडांना घालू’, असे गोरेगावच्या श्रीधर कापरेकर यांनी सांगितले.

कोकणात नव्हे यंदा मुंबईतच गणेशोत्सव

कोकणात गणेशोत्सवाला जाण्यासाठी प्रतिकू ल परिस्थिती असल्याने अनेकोंनी यंदा गावी न जाता मुंबईतच गणपती बसवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांबाबत सरकारचा काही निर्णय होत नव्हता. खासगी वाहनाने गेल्यास गावी काही दिवस आणि मुंबईत परतल्यानंतर काही दिवस विलगीकरणात घालवावे लागतील. आधीच टाळेबंदीमुळे कामावर जाता येत नव्हते. आता कार्यालये सुरू झाली असताना इतके  दिवस सुट्टी कोण देणार, असे गोरेगावच्या दीपक सावंत यांनी सांगितले. खासगी वाहनाने येण्या-जाण्यास ९० हजार रुपये खर्च येईल. ई-पास मिळण्याचीही खात्री नाही. त्यामुळे मुंबईतच गणपती बसवायचा निर्णय प्रभादेवीच्या राजू सावंत यांनी घेतला. ‘राजकीय पक्षांना दरवर्षी मतदान करूनही कोकणात जाण्यासाठी त्यांनी सोय के ली नाही. बातम्यांची सर्व कात्रणे कापून ठेवली आहेत. पुढच्या वेळी मते मागायला येतील तेव्हा दाखवेन’, असे राजू म्हणतात.