देशाच्या अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक डॉ. होमी भाभा यांच्या मुंबईतील ऐतिहासिक बंगल्याचा लिलाव अखेर बुधवारी पार पडला. मलबार हिलवर समुद्राभिमुख दिमाखात उभा असलेला ‘मेहरनगीर’ हा बंगला ३७२ कोटी रुपयांना विकला गेला. १३ हजार ९५३ चौरस फुटाचा हा बंगला लिलावात विकत घेणाऱ्या व्यक्तीचे नाव मात्र तिच्याच विनंतीवरून जाहीर केले गेलेले नाही. सध्या नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिग आर्ट्सच्या ताब्यात असलेल्या या बंगल्याची मूळ किंमत २५७ कोटी रुपये एवढी ठरवण्यात आली होती. या किंमतीपेक्षा ११५ कोटी रुपयांची जादा बोली बंगल्यावर लावण्यात आली.
अणुऊर्जा क्षेत्रात भारताचे नाव जागतिक स्तरावर नेणारे डॉ. भाभा यांच्या बंगल्याचा लिलाव रोखण्यासाठी अनेकांनी अनेक स्तरांवर प्रयत्न केले. भाभा अ‍ॅटॉमिक रिसर्च सेंटरच्या (बीएआरसी) काही कर्मचाऱ्यांनी यासाठी थेट केंद्राकडे याचिका पाठवत मुंबई उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. या बंगल्यामध्ये अणुऊर्जा विषयक संग्रहालय उभारण्यात यावे, अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली होती. उच्च न्यायालयाने या लिलावावर बंदी घालण्यास नकार देत आपला निकाल २३ जूनपर्यंत राखून ठेवला आहे.
डॉ. होमी भाभा यांचा १९६६मध्ये विमान दुर्घटनेत दुर्दैवी अंत झाल्यानंतर या बंगल्याचा ताबा त्यांचे भाऊ जमशेद भाभा यांच्याकडे गेला. जमशेद भाभा हे स्वत: कला आणि संस्कृतीचे उपासक असल्याने त्यांनी एनसीपीए या संस्थेला सातत्याने मोठे करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मृत्यूनंतर या जागेचा ताबा एनसीपीएकडेच होता.
मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना साकडे
या वास्तूचे जतन होऊन तेथे अणुऊर्जाविषयक स्मारक किंवा संग्रहालय तयार करावे, अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहीले आहे.भारतीय अणुकार्यक्रमाचे जनक आणि ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा यांच्या या बंगल्याची वास्तू संरक्षित करून जतन करावी. तसेच ही वास्तू म्हणजे राष्ट्रीय स्मारक असल्याचे जाहीर करावे, अशी विनंती या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना केली आहे.