सांताक्रूझ-चेंबूर लिंक मार्ग, पूर्व मुक्त मार्ग तसेच मोनो व मेट्रो रेल प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखद झाला असला तरी या परिसरातील जागांच्या किमती मात्र सामान्यांच्या आवाक्याबाहेर ठरल्या आहेत. या प्रकल्पाशी संबंधित चेंबूर, सायन, वडाळा, अंधेरी परिसरातील जागांच्या किमतीत चक्क २० ते ३० टक्क्य़ांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अत्याधुनिक सुविधा पुरणाऱ्या विकासकांनी तर या वाहत्या गंगेत हात धुवून घेत पूर्वीच्या दरामध्ये दोन ते तीन हजार रुपयांची वाढ केली आहे. घरांचा बाजार थंड असतानाही या प्रकल्पांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.  
सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड तब्बल आठ-नऊ वर्षे रखडला. त्यामुळे या मार्गावरील प्रकल्पांना फारसा उठाव नव्हता. मात्र हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर पूर्वी रखडलेल्या गृहप्रकल्पांना जोर येऊ लागला आहे. गोवंडी येथे कुकरेजा बिल्डर्सचा मोठा गृहप्रकल्प आता आकार घेऊ लागला आहे. याशिवाय चेंबूरमध्ये अनेक प्रकल्पांचे दर पूर्वीच्या दरांपेक्षा चार हजार रुपयांनी वाढले आहेत, अशी माहिती एका इस्टेट एजंटने दिली. सध्या चेंबूर हा हब म्हणून पाहू लागल्याचा हा परिणाम असल्याचेही या सूत्रांनी सांगितले.
सायन तसेच चेंबूर जंक्शनवरील वाहतूक कोंडीमुळे वडाळा वा सायन येथील बडय़ा विकासकांच्या प्रकल्पांना फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. आता मात्र या प्रकल्पांची मागणी वाढू लागली आहे. ‘दोस्ती रिएलिटी’ तसेच अजमेरा बिल्डर्स आणि लोढा बिल्डर्समार्फत वडाळा परिसरात मोठय़ा गृहसंकुले उभारली जात आहे. या संकुलात सदनिकेची किमान किंमत दोन कोटी आहे. सायन परिसरात कल्पतरू तसेच हबटाऊन (आकृती) बिल्डर्समार्फतही गृहप्रकल्प राबविले जात आहेत. या प्रकल्पांनाही सध्या खूपच मागणी असल्याचे एका स्थानिक इस्टेट एजंटने सांगितले. या प्रकल्पांना दोन-तीन वर्षांपूर्वी फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र पूर्व मुक्त मार्ग तसेच सीएसटीपर्यंतच्या मार्गावर उभे राहिलेले उड्डाण पूल आणि चेंबूर-सांताक्रूझ लिंक रोडमुळे या परिसराला सोन्याचा भाव आला आहे.  
*चेंबूर – १८ ते २० हजार  (१४ ते १६ हजार)
*सायन – २२ ते २६ हजार  (१५ ते १८ हजार)
*वडाळा – १८ ते २४ हजार  (१० ते १२ हजार)
*अंधेरी – १८ ते २२ हजार  (१२ ते १४ हजार)
चांगले रस्ते, उड्डाण पुल, जलद मार्ग आदी पायाभूत सुविधा वाढल्या की, अर्थातच घरांच्या किमतीत वाढ संभवते. ती वाढ तीन प्रकारे होत असते. पहिल्यांदा जेव्हा हे प्रकल्प जाहीर होतात तेव्हा. नंतर प्रकल्पाचे काम सुरू होते तेव्हा आणि शेवटी प्रकल्प पूर्ण होतात तेव्हा. आता चेंबूर-सांताक्रूझ लिंक रोड, पूर्व मुक्त मार्ग तसेच मोनो रेल आणि एकूणच पूर्ण झालेल्या प्रकल्पांमुळे साहजिकच मुंबईत सोन्याचा भाव असलेल्या घरांच्या किमतीत वाढ होऊ शकते
आशुतोष लिमये, प्रमुख,संशोधन विभाग, जोन्स लँग लासेले