२०१६ मध्ये हृतिकने काइट आणि क्रिशमधील त्याची सहकारी अभिनेत्री कंगना रनौतला कायदेशीर नोटीस पाठविली होती. तीच्याशी कोणताही संबंध असल्याचा त्याने इन्कार केला होता. रानौतने त्याला शेकडो ईमेल पाठवल्याचा दावाही त्याने केला होता. या तक्रारीनंतर दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. हृतिक रोशनने आपल्या तक्रारीत असा आरोप केला होता की कोणीतरी त्याच्या नावाच्या बोगस ईमेल आयडीवरून अभिनेत्री कंगना रनौतला ईमेल करीत आहे.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अभिनेता हृतिक रोशन याला कंगना रनौतने दिलेल्या तक्रारीप्रकरणी निवेदन करण्यासाठी क्राईम इंटेलिजन्स युनिटला (सीआययू) भेटण्यास सांगितले आहे, असे एका अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले.

यानुसार अभिनेता हृतिक रोशन आज मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या कार्यालयात दाखल झाला.

आयपीसीच्या कलम ४१९ (व्यक्तीद्वारे फसवणूक) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ सी (ओळख चोरी), ६६ डी (संगणक स्रोतांचा वापर करून व्यक्तीद्वारे फसवणूक) अंतर्गत सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हृतिकच्या वकिलाने प्रलंबित चौकशीबाबत मुंबई पोलिस आयुक्तांकडे संपर्क साधला होता, त्यानंतर ते गुन्हे शाखेच्या सीआययूकडे वर्ग करण्यात आले, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.