रसायनशास्त्र प्रश्नपत्रिकेतील चूक

बारावीच्या रसानयशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेतील चुकीच्या प्रश्नांसाठी विद्यार्थ्यांना सात गुण देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (राज्य मंडळ) घेण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असेल त्यांना गुण देण्यात येणार आहेत. मात्र रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी राज्य मंडळाने मौन बाळगले आहे.

बारावीला रसायनशास्त्रातील विद्यार्थ्यांना सात गुणांचा आधार मिळाला आहे. प्रश्नपत्रिकेतील चुकीच्या प्रश्नांसाठी भरपाई म्हणून ते देण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला आहे.

प्रश्न क्रमांक २, ३, ६ आणि ८ हे प्रश्नांचे गुण देण्याची शिफारस विषयाच्या नियामकांनी राज्य मंडळाकडे केली होती. त्यानुसार गुण देण्यात येणार आहेत. मात्र, सरसकट सर्व विद्यार्थ्यांना हे गुण न देता ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असेल, त्यांनाच हे गुण मिळू शकतील. मात्र, त्यामुळे उत्तरपत्रिकेत नुसता प्रश्न क्रमांक लिहिला असेल तरीही विद्यार्थ्यांना गुण मिळू शकतील. त्यामुळे ७ गुण आणि प्रात्यक्षिक परीक्षेतील गुणांच्या आधारे यंदा रसायनशास्त्रात उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

रसायनशास्त्राची परीक्षा २८ फेब्रुवारीला झाली होती. मात्र त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी मूल्यांकनाच्या कामावर बहिष्कार टाकल्यामुळे नियामकांच्या बैठका खोळंबल्या होत्या.

चार दिवसांपूर्वी झालेल्या नियामकांच्या बैठकीत प्रश्नपत्रिकेतील तीन प्रश्न संदिग्ध असल्याचे तर एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या प्रश्नांचे गुण देण्याची शिफारस मंडळाकडे करण्यात आली.

प्रश्नपत्रिका फुटीबाबत मौन

रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मुंबईतील एका परीक्षा केंद्रावर फुटल्याचे उघड झाले होते. पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना ताब्यातही घेतले. परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर प्रश्नपत्रिका सापडल्या होत्या. याबाबत राज्य मंडळाने मात्र मौन बाळगले आहे. मात्र, पुन्हा परीक्षा घेण्यात येणार नसल्याचा निर्वाळा मंडळाकडून देण्यात आला आहे.

भूगोलाच्या प्रश्नपत्रिकेत चुका?

बारावीची भूगोलाची परीक्षा मंगळवारी झाली. या परीक्षेत उर्दू माध्यमाच्या प्रश्नपत्रिकेत भाषांतराच्या चुका असल्याची तक्रार शिक्षकांकडून करण्यात आली आहे. त्याबाबत नियामकांच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असे राज्य मंडळाकडून सांगण्यात येत आहे.

नियामकांकडून करण्यात आलेल्या शिफारशीनुसार चुकीच्या प्रश्नांचे गुण देण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला आहे.  मात्र विद्यार्थ्यांना सरसकट गुण न देता ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असेल त्यांना गुण मिळू शकतील. रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर सापडल्याप्रकरणी पोलिसांकडून अहवाल आलेला नाही. पोलिसांचा अहवाल आल्यानंतर याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल.

शकुंतला काळे, अध्यक्ष, राज्य मंडळ