लोअर परळ स्थानकाच्या पश्चिमेकडील आलिशान पेनिन्सुला बिझिनेस पार्कच्या मुख्य प्रवेशद्वाराशी गेल्या पाच दिवसांपासून वेगळाच माहोल पाहावयास मिळत आहे. माणुसकीचा माहोल!.. काही दिवसांपूर्वी याच परिसरातील सात-आठ मित्रांनी अकोला, कोल्हापूर, पुण्यातील ‘माणुसकीच्या भिंती’ची माहिती वर्तमानपत्रात वाचली आणि मुंबईकरांच्या माणुसकीला साद घालण्याचे त्यांनी ठरविले. २४ तारखेला पेनिन्सुलीच्या प्रवेशद्वाराशेजारी ‘माणुसकीची भिंत’ उभी राहिली, आणि मुंबईकरांच्या माणुसकीच्या दर्शनाने ही भिंत अक्षरश भारावून गेली.. गेल्या पाच दिवसांत या भिंतीला आणि अवघ्या परिसरालाच माणुसकीचे अनोखे दर्शन घडले आहे.

समाजात ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ असे दोन वर्ग असतात. ‘आहे रे’ वर्गाकडे असलेले सारे अनेकदा ओसंडून चाललेले असते, तर या वर्गाच्या नशिबी असलेले सारे काही ‘नाही रे’ वर्गाला स्वप्नातदेखील साध्य नसते. समाजातील ही दरी दूर करण्यासाठी माणुसकीला साद घालण्याचा एक वेगळा उपक्रम महाराष्ट्रात काही शहरांमधील माणसांनी राबविला, आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळत गेला. ज्यांच्याकडे त्यांच्या गरजेहून अधिक काही आहे, त्यांनी ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांना ते द्यावे आणि माणुसकीचा एक पूल उभा करावा असे आवाहन करीत ही ‘माणुसकीची भिंत’ उभी राहिली, आणि ‘आहे रे’ वर्गाने ‘नाही रे’ वर्गासाठी आपल्याकडील गरजेहून अधिक असलेल्या वस्तूंचा साठा या भिंतीवर रिता केला. ‘ज्याच्याकडे जास्त आहे, त्याने द्यावे, ज्याच्याकडे नाही त्याने घेऊन जावे’ ही संकल्पना भिंतीवर साकारली, आणि कपडे, चादरी, स्वेटर, लहान मुलांचे कपडे, साडय़ा, ड्रेस, चपला-बूट, बॅगा, खेळणी अशा वस्तूंनी भिंत भरून गेली. लोअर परळला हा उपक्रम सुरू झाला, आणि तेथील रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या अनेक चाकरमान्यांनी येताना आपल्या घरातील चांगल्या अवस्थेतील परंतु वापरात नसलेल्या वस्तू येथे आणून देण्यास सुरुवात केली. या भागात गरीब कामगारांचीही मोठी रहदारी असते. येथे जमलेल्या वस्तूंपैकी गरजेच्या वस्तू नेण्यासाठी संध्याकाळी घरी परतताना त्यांचीही झुंबड उडू लागली, आणि माणुसकी जिवंत करणाऱ्या लहानशाच प्रयत्नांना येणारे यश पाहून ही भिंत भारावून गेली..

तरुणांचा पुढाकार

उद्या, २९ नोव्हेंबरला रात्री दहा वाजेपर्यंत ही भिंत माणुसकीचे दर्शन घडवीत ओसंडून वाहत असेल, आणि असंख्य गरजू कुटुंबे आपापल्या घरी माणुसकीची ही अनोखी ऊब अनुभवत असतील. या भिंतीने साद घातली, आणि माणुसकी जागी झाली. वापरात नसलेले, परंतु वापरता येतील अशी खेळणी, वस्तू आणि स्वच्छ धुऊन घडय़ा केलेल्या कपडय़ांचे वर्गीकरण करून ते खऱ्या गरजूंना मिळावे यासाठी काही तरुणांनी स्वखुशीने काम करण्याची तयारी दाखविली, आणि माणुसकीचा हा पूल दिवसागणिक रुंदावतही गेला.