राज्यातील सरकार हे महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे मी केवळ भाजपाचाच नव्हे तर शिवसेना, रिपाई आणि रासपचाही मुख्यमंत्री आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. मुंबईत भाजपाच्या विशेष कार्यकारिणीच्या बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी मांडलेली ही भुमिका शिवसेनेसाठी टोला असल्याची चर्चा रंगली आहे.

फडणवीस म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा महायुतीचेच सरकार सत्तेत येणार आहे. त्यामुळे मी पुन्हा येईल हे तुम्हाला आधीच सांगितलं आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करण्याचे कारण नाही. फक्त लोकसभेच्या विजयाने हुरळून जाऊ नका, कारण ती लढाई वेगळी तिथलं रणांगण वेगळं होतं. आता विधानसभेसाठी वेगळं रणांगण असणार आहे. त्यामुळे रणांगण बदलल्यानंतर आता रणनीती आणि शस्रेही बदलावी लागतील. त्यामुळे जनतेला गृहित धरण्याची घोडचूक करु नका, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना आपल्या लक्ष्यापासून न हटण्याचा मंत्र दिला.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, महाराष्ट्राची जनता हीच माझी खरी दैवी शक्ती असून जनतेने वेळोवेळी आपल्याला साथ दिली. या सरकारच्या काळातच अनेक प्रश्न कसे निर्माण झाले असा आरोप करणाऱ्या विरोधकांनाही त्यांनी सडेतोड उत्तर दिले. मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील प्रत्येक प्रश्न हे जुन्या आघाडी सरकारच्या काळातच निर्माण झाले आहेत. स्वतःची संस्थानं वाचवण्यासाठी आघाडी सरकार तत्पर असे, आघाडी सरकारमधील राजकारणी इतके कोडगे झाले होते की जनतेला त्यांच्याकडून काहीच अपेक्षा उरल्या नव्हत्या. त्यांच्याकडून कामं होणारच नाहीत असे त्यांना वाटत होते. उलट आमचे सरकार मात्र प्रतिसाद देणारे सरकार असल्याचे जनतेला कळले होते. म्हणूनच आपल्या सरकारच्या काळात अनेक आंदोलने झाली. राज्यातील ही आंदोलनं आणि आरक्षणाचे मुद्दे आपण समर्थपणे पेलू शकलो, असे त्यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करताना सांगितले.