‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम’ करायला शिकविणारे ‘आनंदयात्री’ मंगेश पाडगावकर यांचा लेखनाचा उत्साह ८४ व्या वर्षीही कायम आहे. सध्या आपण ‘बालकवींची कविता-एक अभ्यास’ हा ग्रंथ लिहिण्यात व्यग्र आहोत. हा ग्रंथ लवकरात लवकर लिहून पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे मंगेश पाडगावकर यांनी शुक्रवारी ‘लोकसत्ता’ला सांगितले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांना जाहीर झालेल्या ‘पद्मभूषण’ पुरस्काराच्या निमित्ताने त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही माहिती दिली. बालकवींच्या कविता आणि त्याचे आकलन, त्याचा अर्थ समजून घेणे हे मला एक आव्हान वाटते. त्यांच्या कविता एक वेगळी अनुभूती देतात. हे सर्व या ग्रंथात मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. पुस्तकाची १३० पाने सध्या लिहून झाली असून ‘मौज प्रकाशन’ हे पुस्तक प्रकाशित करणार आहे, असे पाडगावकर म्हणाले.पुरस्कार जाहीर झाल्यानंतर केलेल्या अभिनंदनाचा नम्रपणे स्वीकार करून पाडगावकर म्हणाले की, मी काही आध्यात्मिक किंवा संत नाही. कौतुक केले की मला बरे वाटते. आवडते. ‘पद्मभूषण’ पुरस्कार हा तर मोठा सन्मान आहे. त्यामुळे मला खूप आनंद झाला. कवितेच्या क्षेत्रात मी गेली अनेक वर्षे जे काही काम केले, त्याची दखल केंद्र शासनाच्या पातळीवर घेण्यात आली, असे मला वाटते. माझ्यावर, माझ्या कवितांवर रसिकांनी आणि मराठी वाचकांनी भरभरून प्रेम केले. कवितांची पुस्तके विकत घेतली, काव्य वाचनाच्या कार्यक्रमांना हजेरी लावली आणि वेळोवेळी दाद दिली. बस् आणखी काय हवे! मी आज जो काही आहे, तो मायबाप रसिक आणि वाचक यांच्यामुळेच, अशा शब्दांत  पाडगावकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.