खासगी प्रवासी वाहतूकदार दिवाळी हंगामात प्रवाशांकडून भरमसाट भाडे आकारून लुटतात. त्यामुळे तीन हजार जादा बसगाडय़ा उपलब्ध करून दिल्या जाणार असून त्यामुळे १५ ते १६ हजार फेऱ्या जादा होतील. पण एकाच दिशेने प्रवाशांची गर्दी असते आणि परतीच्या प्रवासात बसगाडी बहुतांश रिकामी असते. गणेशोत्सव, दिवाळी हंगामात अशीच परिस्थिती असते. त्यामुळे एसटीला होणारे नुकसान भरून काढण्यासाठी हंगामी दरवाढ असल्याचे रावते यांनी सांगितले. एसटीच्या आधीच्या संचालक मंडळाने ही दरवाढ ३० टक्के असावी, असा निर्णय घेतला होता. पण मी त्यास संमती दिली नाही. त्याऐवजी साध्या गाडय़ांना व रातराणीला १० टक्के, निमआराम गाडय़ांना १५ टक्के आणि वातानुकूलित गाडय़ांना २० टक्के अशी दरवाढ २० दिवसांसाठी लागू राहील, असे रावते यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ज्या मार्गावर प्रवाशांची मागणी आहे, तेथे खासगी वाहतूकदार दीडपट, दुप्पट, अडीचपटीपर्यंत दर वाढवितात. पण परतीच्या प्रवासात जेव्हा प्रवासी कमी असतात, तेव्हा निम्म्याहून कमी दरातही ते प्रवासी आणतात. पण एसटीने परतीची गाडी बहुतांश रिकामी असली, तरी दोन्ही दिशांच्या प्रवाशांना दरवाढ लागू केली आहे. प्रवाशांच्या अधिक मागणीच्या मार्गाचा अभ्यास करून परतीच्या प्रवासासाठी नियमित किंवा सवलतीची स्वतंत्र तिकीट आकारणी करणे, हे प्रशासनाला अशक्य असल्याने नाइलाजाने दोन्ही दिशेच्या प्रवाशांसाठी ही दरवाढ सरसकट लागू करावी लागत असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी स्पष्ट केले. एसटीचे प्रवासी भारमान आधीच कमी झाले असताना आणि तोटा वाढत असताना या हंगामी दरवाढीचा फटका महामंडळाला आणखी बसण्याची शक्यता आहे.
खासगी अवैध प्रवासी वाहतुकीवर उच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार कडक कारवाई करणार असल्याचे रावते यांनी सांगितले. दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाडय़ातील विद्यार्थ्यांना नोव्हेंबर २०१५ ते पुढील वर्षी परीक्षेपर्यंत ‘स्वाती अभय योजना’ ही मोफत मासिक पास सवलत योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेसाठी महामंडळाला ९ कोटी रुपयांचा आर्थिक भार सहन करावा लागणार आहे.