मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेत (आयडॉल) प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून आता विद्यार्थी २० सप्टेंबपर्यंत प्रवेश घेऊ शकतील.

मान्यतेवरून वर्षभर गाजलेल्या आयडॉलला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून जून महिन्यात मान्यता मिळाली. त्यानंतर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यास जेमतेम एक महिना विद्यापीठाला मिळाला होता. मात्र, जुलै आणि ऑगस्टमध्ये देशभरातील विविध राज्यांमधील पूरस्थितीमुळे दूरशिक्षण संस्थांची प्रवेश पक्रिया पूर्ण होण्यास अडचणी आल्या. प्रवेशास मुदतवाढ न मिळाल्यास अनेक विद्यार्थी वंचित राहण्याची भीती असून त्यामुळे प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात येत होती. त्या पाश्र्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाने देशभरातील सर्व दूर व मुक्त अध्ययन संस्थांना प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यास सप्टेंबर अखेपर्यंत मुदत दिली. त्यामुळे आयडॉललाही प्रवेश पूर्ण करण्यासाठी अधिक कालावधी मिळाला आहे.

आयडॉलची प्रवेश प्रक्रिया २० सप्टेंबपर्यंत सुरू राहील. बी.कॉम, बी.एस्सी आयटी, एमए, एमए शिक्षणशास्त्र, एमकॉम, एमए आणि एमएस्सी गणित, एमएस्सी आयटी, एमसीए, पीजीडीएफएम व पीजीडीओआरएम या अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत. प्रवेश अर्ज http://idoloa.digitaluniversity.ac  या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

अतिवृष्टीमुळे आयोगाने प्रवेशाची मुदत वाढवली असून ज्यांचे प्रवेश घ्यायचे राहिले  आहेत त्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची आणखी एक संधी यामुळे मिळणार आहे, असे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी सांगितले.

आतापर्यंत ६५ हजार प्रवेश :

आतापर्यंत आयडॉलमध्ये ६५ हजार प्रवेश निश्चित झाले असून त्यातील ६२ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश शुल्क भरले आहेत. वाणिज्य शाखेत सर्वाधिक ६२ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. त्याखालोखाल कला या शाखेतील बीए व एमए या अभ्यासक्रमामध्ये १८ हजार २६३ विद्यार्थ्यांनी तर विज्ञान व तंत्रज्ञान या शाखेत १ हजार ४९२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.