सद्य:स्थितीत वाहतुकीच्या साधनांची अनुपलब्धता आणि दूरवरचे परीक्षा केंद्र यामुळे परीक्षेला वेळेवर कसे पोहोचायचे, अशा पेचात असलेल्या केंद्रीय सामायिक प्रवेश परीक्षेच्या (जेईई) परीक्षार्थीच्या मदतीला आयआयटी मुंबईचे देशभरात विखुरलेले आजी-माजी विद्यार्थी सरसावले आहेत. त्यांनी  संकेतस्थळ सुरू केले असून त्यावर नोंदणी केलल्या विद्यार्थ्यांच्या प्रवासाची अडचण सोडवली जाणार आहे.

देशात १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत जेईई मुख्य परीक्षा होणार आहे. अनेक परीक्षार्थीना दूरची परीक्षा केंद्र मिळाली आहेत. काहींना घरगुती अडचणींमुळे परीक्षा केंद्रापर्यंत कसे पोहोचायचे असा प्रश्न भेडसावत आहे. देशातील कोणत्याही भागातील परीक्षार्थीना त्यांच्या परीक्षा केंद्राजवळ पोहोचण्यासाठी प्रवासाची सोय आयआयटी मुंबईचे आजी आणि माजी विद्यार्थी करणार आहेत. स्वत:जवळील वाहने किंवा गरजू परीक्षार्थीचा खासगी वाहनांचा खर्च उचलणे अशा स्वरूपात मदत करण्यात येईल.

https://www.eduride.in/ या संकेतस्थळावर परीक्षार्थीनी सर्व माहिती, पिनकोडसह भरायची आहे. तसेच परीक्षेच्या प्रवेश पत्रावरील त्यांची माहितीही द्यावी लागणार आहे.

या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्वयंसेवकांनाही त्यांच्याकडे असलेली वाहने, प्रवासाचे ठिकाण, कोणत्या प्रकारची आर्थिक मदत या प्रवासासाठी दिली जाणार आहे, याची माहिती भरावी लागणार आहे.