न्यायालयाकडे बिनशर्त माफीनामाही

बेकायदा फलकबाजी करणार नसल्याचे आश्वासन देऊनही बेकायदा फलकबाजी केल्याप्रकरणी अवमान कारवाईचा इशारा न्यायालयाने दिल्यानंतर बेकायदा फलकबाजी केल्याची कबुली मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते आशीष शेलार यांनी शुक्रवारी न्यायालयात दिली. एवढेच नव्हे तर पक्ष कार्यकर्त्यांनी केलेल्या चुकीची सर्वस्वी जबाबदारी आपलीच असल्याचे मान्य करत दोन्ही नेत्यांच्या वतीने न्यायालयात बिनशर्त माफीनामाही सादर केला. तसेच बेकायदा फलकबाजी न करण्याबाबत पक्ष कार्यकर्त्यांना दर तीन महिन्यांनी आवाहन करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर त्याचीही अंमलबजावणी करण्याचे आणि भविष्यात घडल्या प्रकाराची पुनरावृत्ती होणार नसल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
शिवाय मनसे, भाजपने बेकायदा होर्डिग्ज लावली जाणार नाही, अशी हमी प्रतिज्ञापत्राद्वारे दिली होती. मात्र अशी हमी देणाऱ्या पक्षांचीच बेकायदा फलके रस्तोरस्ती झळकत असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी न्यायालयात करत त्याची छायाचित्रेही सादर केली. त्यामुळे न्यायालयाने या पक्षांना अवमान कारवाई का केली जाऊ नये अशी विचारणा करून नोटीस बजावली होती. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती व्ही. एल. अचलिया यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी याप्रकरणी सुनावणी झाली.
त्या वेळी राज ठाकरे आणि आशीष शेलार यांनी बेकायदा होर्डिग्ज लावण्याबाबत पक्ष कार्यकर्त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याची कबुली दिली. शेलार यांनी या कृतीची जबाबदारी आपली असल्याचे नमूद करत न्यायालयाची माफी मागितली. तसेच भविष्यात असे होणार नसल्याचे आश्वासन दिले. तर न्यायालयाच्या आदेशाचे आपण स्वत: नाही, पण आपल्या पक्ष कार्यकर्त्यांनी उल्लंघन केल्याचे राज ठाकरे यांच्या वतीने कबूल करण्यात आले व त्यासाठी माफीही मागण्यात आली.
तसेच ज्या कार्यकर्त्यांनी हे उल्लंघन केले त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्यावर कारवाई का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करण्यात आली असल्याची माहितीही दिली. न्यायालयाने दोन्ही नेत्यांचा माफीनामा मान्य करत त्यांच्या विरोधात बजावलेली अवमान नोटीस रद्द केली. त्याचवेळी बेकायदा फलक न लावण्याबाबत पक्ष कार्यकर्त्यांना दर तीन महिन्यांनी आवाहन करण्याचेही आदेश दिले. मात्र ही मुदत सणासुदीच्या काळात वा दर सहा महिन्यांची ठेवण्याची विनंती दोन्ही नेत्यांच्या वतीने करण्यात आली. जी मान्य करण्यास न्यायालयाने नकार दिला.