दिव्यात बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी गेल्या काही महिन्यांपासून अडचणीत सापडलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक शैलेश पाटील यांची स्थायी समितीमधील पक्षाच्या रिक्त जागेवर नियुक्ती करण्यात येणार असल्याच्या चर्चेमुळे ठाणे महापालिकेतील पक्षाच्या अन्य नगरसेवकांमध्ये सोमवारी खळबळ उडाली.
बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी पाटील यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा प्रस्ताव खुद्द आयुक्तांनी सर्वसाधारण सभेपुढे सादर केला असताना अशा नगरसेवकाला स्थायी समितीवर पाठवून पक्ष स्वत:च्या पायावर कु ऱ्हाड मारून घेत असल्याची चर्चा हे नगरसेवक करत होते. स्थायी समितीमधील मलईदार पदासाठी पक्षात अर्थपूर्ण व्यवहार झाल्याचा आरोप केला जात असून ठाण्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.
ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीमधील आठ सदस्य निवृत्त झाल्याने यासंबंधीच्या निवडीची प्रक्रिया येत्या काही दिवसांत पूर्ण केली जाणार आहे. ठाण्यात मनसेचे सात नगरसेवक असून संख्याबळानुसार स्थायी समितीत या पक्षाचा एक नगरसेवक निवडून जाणार आहे. महापालिकेतील राजकीय हेवेदाव्यामुळे पहिल्या वर्षी स्थायी समितीचे कामकाज पूर्णवेळ चालले नाही. त्यानंतर सलग दोन वर्षे या समितीवर पक्षाकडून सुधाकर चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. यंदा चव्हाण निवृत्त होत असल्याने त्यांच्या जागेवर अन्य सहा नगरसेवकांमध्ये चुरस आहे. असे असताना दिवा गावातील नगरसेवक शैलेश पाटील यांची या पदावर निवड होणार असल्याच्या चर्चेमुळे अन्य नगरसेवक अस्वस्थ झाल्याचे चित्र दिसत होते.

बडतर्फीची टांगती तलवार
शैलेश पाटील यांनी दिव्यातील सुभद्राबाई कॉलनी, आई निवास आणि जय भवानी चाळीचे बेकायदा बांधकाम केल्याचा त्यांच्यावर ठपका असून या बांधकामांची करआकारणीही पाटील यांच्या नावे झाली होती. ही चाळ पाडून मध्यंतरी इमारत उभारण्यात आली असली तरी महापालिका अधिनियमानुसार त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तत्कालीन आयुक्त असीम गुप्ता यांनी या संबंधीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे ठेवला असला तरी ठाण्यातील मांडवली राजकारणामुळे त्यास अद्याप मंजुरी मिळालेली नाही. अशी वादग्रस्त प्रतिमा असलेल्या नगरसेवकास स्थायी समितीची बक्षिसी कशी दिली जाते, असा सवाल उपस्थित केला जात होता. या प्रकरणी शैलेश पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही त्यांनी दूरध्वनी उचलला नाही. तसेच मनसेसंपर्कप्रमुख अभिजीत पानसे यांच्याशी संपर्क साधूनही त्यांनीही प्रतिसाद दिला नाही.