अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर सध्या महापालिकाने कारवाईचा बडगा उगारला असून सार्वजनिक वाहनतळांलगत ५०० मीटरच्या आत गाडय़ा नियमबाह्य़ उभ्या केल्यास पाच हजार ते पंधरा हजारांपर्यंत दंड आकारण्यात येत आहे. ७ जुलैपासून महापालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली असून सात दिवसांत २३ लाखांची दंडवसुली केली आहे. सर्वात जास्त दंडवसुली ९ जुलै रोजी करण्यात आली आहे. यादिवशी महापालिकेने १०७ वाहनांचे टोचन (टो) केलं होतं. त्यांच्याकडून एकूण ५.२ लाखांचा दंड वसूल कऱण्यात आला. पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या २३ सार्वजनिक वाहनतळांलगत कारवाई करण्यात येत आहे.

वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे गाडय़ा उभ्या करण्यासाठी (पार्किंग) मुंबईत जागा मिळणे मुश्कील होऊ लागले आहे. वाहनचालक नियमांचे पालन न करता रस्त्यावर मिळेल तेथे गाडय़ा उभ्या करत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होतो. अशा वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी पालिकेने वाहनतळाच्या आसपास नियमबाह्य़ पार्किंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याचे ठरवले आहे. महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी तशी घोषणा केली होती.

महापौरांची गाडी नो पार्किंगमध्ये, सर्वसामन्यांना दंड ठोठावणारी पालिका काय कारवाई करणार ?

‘नो पार्किंग’ फलकांविनाच चालकांना दंड!
पहिल्याच दिवशी पालिकेचा ६३ वाहनांवर बडगा

महापालिका सहआयुक्त देवेंद्र कुमार जैन यांच्या जी साऊथ वॉर्डमध्ये सहा सार्वजनिक वाहनतळं असून सुरुवातीला येथे विरोध झाला होता, पण सध्या स्थानिकांचा विरोध मावळला आहे. “आम्ही स्थानिकांना या वाहनतळांवर खूप जागा असल्याचं समजावून सांगितलं. या सहा वाहनतळांवर १० हजार वाहनं पार्क केली जाऊ शकतात” अशी माहिती जैन यांनी दिली आहे. या वॉर्डमध्ये १.६ लाखांचा दंड वसूल करण्यात आला असून वाहनतळांवर पार्किंग होणाऱ्या गाड्यांच्या संख्येत पाच हजाराने वाढ झाली आहे.

“सुरुवातीला १३ हजार वाहनं पार्क केली जात होती. पण आता हा आकडा १८ हजारांवर पोहोचला आहे. याचाच अर्थ रस्त्यावर जास्त जागा मोकळी झाली आहे”, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

वाहन नियमबाह्य़ उभे केल्यास आजपासून महादंड
सार्वजनिक वाहनतळांवर स्थानिकांना सवलत

कारवाईचे नियोजन व व्यवस्थापन हे २४ प्रशासकीय विभागांत साहाय्यक आयुक्तांच्या स्तरावर करण्यात येत असून कारवाईचा दैनंदिन अहवाल तयार करण्यात येत आहे. कारवाईसाठी आवश्यकतेनुसार वाहतूक पोलिसांचे साहाय्य घेण्यात येत आहे. या कारवाईअंतर्गत नियमबाह्य़ उभ्या केलेल्या वाहनांचे टोचन (टो) करण्यात येत आहे. टोचन केलेल्या वाहनांवर मालकी हक्काचा दावा होईस्तोवर वाहनांवर प्रतिदिन विलंब आकारदेखील लावण्यात येत आहे. टोचन केलेली वाहने संबंधित मालकांद्वारे ३० दिवसांच्या आत सोडवून न नेल्यास ती वाहने बेवारस असल्याचे समजून त्यांची लिलावात विक्री केली जाईल, असा इशाराही पालिकेने दिला आहे. या कारवाईच्या दुसऱ्या टप्प्यात काही रस्ते ‘नो पार्किंग झोन’ म्हणून निर्धारित करण्यात येणार असून या रस्त्यांवर गाडी उभी केल्यास महापालिकेद्वारे कारवाई करण्यात येणार आहे. महापालिकेच्या सर्व ७ परिमंडळीय उपायुक्तांना व सहआयुक्तांना त्याकरिता रस्ते निर्धारित करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.

कारवाई कशी?
महापालिकेद्वारे विविध १४६ ठिकाणी तब्बल ३४ हजार ८०८ वाहने ‘पार्क’ करण्याची सुविधा उपलब्ध आहे. पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या २३ ठिकाणी असणाऱ्या सार्वजनिक वाहनतळांलगतच्या ५०० मीटर परिसरात कारवाई केली जाणार आहे. पालिकेच्या वाहतूक खात्याद्वारे याबाबत जनजागृती करणारे फलकही लावण्यात आले आहेत.

सार्वजनिक वाहनतळांवर स्थानिकांना सवलत
पालिकेच्या २६ सार्वजनिक वाहनतळांवर गाडय़ा उभ्या करण्यासाठी सध्या जे दर लावण्यात आले आहेत त्यात स्थानिक नागरिकांना सवलत मिळणार आहे. स्थानिक नागरिकांना तब्बल अर्ध्या किमतीत मासिक पास मिळणार आहे. येत्या महिन्याभरात ही सवलत लागू होणार आहे. सार्वजनिक वाहनतळांपासून ५०० मीटरच्या परिसरात गाडय़ा लावणाऱ्यांवर पालिकेने कारवाई सुरू केल्यानंतर पार्किंगचे दर कमी करण्याची मागणी विविध विभागांतून होऊ लागली होती. त्यानंतर पालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे.