News Flash

अनधिकृत रेल्वे तिकिटे विकणाऱ्या महिलेला अटक

पश्चिम रेल्वेमार्गावर सध्या बनावट तिकीट विक्रेत्यांचा सुळसुळाट झाला असून गेली २५ वर्षे अशा प्रकारे बनावट तिकीट विक्री करणाऱ्या एका

| November 15, 2013 05:04 am

पश्चिम रेल्वेमार्गावर सध्या बनावट तिकीट विक्रेत्यांचा सुळसुळाट झाला असून गेली २५ वर्षे अशा प्रकारे बनावट तिकीट विक्री करणाऱ्या एका महिलेला मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी अटक केली. आपण अधिकृत दलाल आहोत, असे सांगून ही महिला तिकिटाची गरज असलेल्या प्रवाशांना नाडत असे. तिच्या हाताखाली ६-८ मुले काम करत असून  काहींना ताब्यात घेण्यात आले आहे.
मुंबई सेंट्रल येथून पश्चिम रेल्वेमार्गावर जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाडय़ा सुटतात. त्यामुळे येथे बेकायदा तिकीट विक्री करणाऱ्या दलालांचा सुळसुळाट असतो. मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी गेल्या काही महिन्यांपासून या दलालांवर वचक बसवण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान काही प्रवाशांनी फसवणुकीची तक्रार दाखल केल्यानंतर रेल्वे पोलिसांनी त्यात लक्ष घातले. त्या वेळी रहीमुन्नीसा रशीद शेख उर्फ भाभी (५५) ही महिला तिच्या हाताखालील सहा ते आठ मुलांना बरोबर घेऊन बेकायदा तिकीट विक्री करत असल्याचे आढळले, अशी माहिती मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र त्रिवेदी यांनी दिली.
आम्ही स्टेशन परिसरात चोख बंदोबस्त ठेवला असल्याने ही महिला टोळीतील एखाद्या मुलाला पाठवून तिकिटे काढून आणायची. त्यानंतर दुसऱ्या एखाद्या मुलाला तिकीटगृहाजवळ पाठवून गरजू प्रवासी हेरायला सांगायची. त्या प्रवाशाला गाठून, आम्ही अधिकृत तिकीट दलाल आहोत, तुम्हाला तिकीट मिळवून देतो, असे सांगत स्थानकाबाहेर नेले जायचे. स्थानकाबाहेर रहीमुन्नीसा त्या प्रवाशाला भेटायची. तुमचे ओळखपत्र आणि पैसे द्या, तिकीट देतो, असे सांगून ओळखपत्र ताब्यात घ्यायची. एकदा ओळखपत्र ताब्यात आले की, तिकिटाच्या रकमेपेक्षा दुप्पट-तिप्पट रक्कम मागायची, असे त्रिवेदी यांनी सांगितले. याबाबत रेल्वे पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचला. या सापळ्यात रहीमुन्नीसा आणि तिचे साथीदार अलगद अडकले. जीत सिंग, सोनवीर सिंग चौहान, जयराम राय, दीपक नवगिरे, कर्मा खन्ना, जयकुमार नायडू अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. पोलिसांनी यांना अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १७ नोव्हेंबपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2013 5:04 am

Web Title: illegal railway ticket selling woman arrested
टॅग : Railway Ticket
Next Stories
1 चंदा कोचर यांचे आठ बनावट ईमेल!
2 घरफोडी करणाऱ्या आरोपीस जम्मू-काश्मीरमधून अटक
3 ५५ लाखांची फसवणूक
Just Now!
X