मुंबई : समुद्रकिनाऱ्यापासून दोन किलोमीटर क्षेत्रातील राहणाऱ्या भाविकांना गणेशमूर्तीचे समुद्रात विसर्जन करण्याची मुभा मुंबई महापालिकेने दिली आहे. मात्र समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहणाऱ्यांनी घरी किंवा जवळच्या कृत्रिम तलावांमध्ये गणेश विसर्जन करावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. समुद्रकिनाऱ्यांवर गर्दी टाळण्यासाठी ठिकठिकाणी मोठय़ा प्रमाणावर कृत्रित तलाव उभारण्यात येणार असून मंडळ आणि सोसायटय़ांनाही कृत्रिम तलावांची परवानगी देण्यात येणार आहे.

येत्या २२ ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरू आहे. करोनाच्या संसर्गामुळे यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. मुंबईमध्ये १२ हजार सार्वजनिक, तर दोन लाखांहून अधिक घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात येते. दीड, पाच, सात, दहाव्या दिवशी गणेश विसर्जन करण्यात येते. गणेश विसर्जनाच्या निमित्ताने समुद्रकिनारा, नदी, तलावाच्या काठावर होणारी गर्दी टाळण्यासाठी यंदा पालिकेने १६७ ठिकाणी कृत्रिम तलाव उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सोसायटय़ांनाही तात्पुरता कृत्रिम तलाव उभारण्यास परवानगी देण्यात येणार आहे.

समुद्रकिनाऱ्यावर गणेश विसर्जन करता येईल की नाही याबाबत भाविकांमध्ये संभ्रम होता. त्यामुळे पालिकेने समुद्रकिनाऱ्यापासून दोन किलोमीटर क्षेत्रात वास्तव्यास असलेल्या भाविकांना समुद्रात गणेश विसर्जन करण्यास परवानगी असल्याचे बुधवारी जाहीर केले. समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहणाऱ्या भाविकांनी घरी किंवा जवळच्या कृत्रिम तलावात गणेश विसर्जन करावे. मात्र समुद्रकिनारा अथवा कृत्रिम तलावांमध्ये गणेश विसर्जन करताना सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करावे, तसेच मुखपट्टी, सॅनिटायझर आदींचा वापर करावा, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.