दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी वर्ग हैराण झाला असताना राज्यातील भाजप सरकारने कर्जमाफीस नकार देणे, यापाठोपाठ केंद्राने फक्त ३१०० कोटी रुपयांची मदत देणे यावरून भाजपने राज्यातील शेतकऱ्यांवर अन्यायच केल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी मंगळवारी केली.
राज्याच्या इतिहासात सर्वाधिक आत्महत्या या २०१५ मध्ये झाल्या. या पाश्र्वभूमीवर केंद्राकडून भरीव मदत आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांचे कर्जमाफ करून दिलासा देण्याची गरज होती. पण शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यास नकार देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या विरोधातच भूमिका घेतली आहे. सध्याच्या परिस्थितीत केंद्राकडून १० ते १५ हजार कोटींची मदत अपेक्षित असताना फक्त ३१०० कोटी रुपयांची मदत देऊन सत्ताधारी भाजपने राज्याची बोळवण केल्याची टीका चव्हाण यांनी केली आहे. विरोधात असताना शिवसेनेने केंद्राकडून भरीव मदतीची अपेक्षा व्यक्त केली होती. आता शिवसेनेला ही मदत मान्य आहे का, असा सवालही चव्हाण यांनी केला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर ज्योत तेवत ठेवण्याकरिता केंद्र सरकारने खर्च करण्यास काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. हा जनतेच्या पैशाचा अपव्यय असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.