दोन वर्षांत ४७ हजार विद्यार्थ्यांना त्रास, अर्जामध्ये २५ हजारांची वाढ

रसिका मुळ्ये, मुंबई</strong>

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांमधील एक घोळ संपला म्हणावा तर, नवा गोंधळ पुढे येतो. गेल्या दोन शैक्षणिक वर्षांत सुमारे ४७ हजार विद्यार्थ्यांना चुकीच्या मूल्यांकनाचा फटका बसला असून या विद्यार्थ्यांचे निकाल पुनर्मूल्यांकनात बदलले आहेत. निकालातील गोंधळामुळे पुनर्मूल्यांकनासाठी आलेल्या अर्जामध्येही वाढ झाली आहे.

उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनातील गोंधळाचा दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना फटका बसतो. मूल्यांकनातील त्रुटींमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य पणाला लागते. गेल्या दोन शैक्षणिक वर्षांमध्ये  ७ हजार विद्यार्थ्यांचे निकाल पुनर्मूल्यांकनाच्या फेऱ्यांनंतर बदलले आहेत. शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मधील पहिल्या सत्रात (२०१७ ऑक्टोबर) ४७ हजार ७१७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी १८ हजार २५४ विद्यार्थी पुनर्मूल्यांकनानंतर उत्तीर्ण झाले. या शैक्षणिक वर्षांतील दुसऱ्या सत्रात (२०१८ एप्रिल) पुनर्मूल्यांकनासाठी आलेल्या अर्जामध्ये साधारण दोन हजारांनी वाढ झाली. या सत्रात ४९ हजार ५१६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी १६ हजार ३८६ विद्यार्थ्यांचे गुण बदलले. याशिवाय अनेक विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकनातही पूर्ण तपासल्या नसल्याचे नुकतेच उघडकीस आले होते.

गेल्या शैक्षणिक वर्षांत म्हणजे २०१८-१९ मध्येही मूल्यांकनातील गोंधळ कायम राहिला. या शैक्षणिक वर्षांच्या पहिल्या सत्रात (२०१८ ऑक्टोबर) ४२ हजार २०५ विद्यार्थ्यांपैकी १३ हजार १६८ विद्यार्थ्यांचे निकाल बदलले. आधीच्या वर्षांच्या तुलनेत अर्जाची घटलेली संख्या दिलासादायक वाटत असताना दुसऱ्या सत्रात (२०१९ एप्रिल) हा भ्रम मोडीत निघाला.

पुनर्मूल्यांकनासाठी आलेल्या अर्जामध्ये जवळपास २५ हजारांची वाढ झाली असून विद्यापीठाकडे ६९ हजार ८०२ अर्जाचा गठ्ठा साठला. या सर्व विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकनाचे निकाल देणे अद्यापही परीक्षा विभागाला शक्य झालेले नाही, असे विहार दुर्वे यांनी माहिती अधिकार कायद्यांनुसार विद्यापीठाकडून मिळालेल्या माहितीतून उघड झाले आहे.

विद्यापीठाची कोटय़वधींची कमाई

* एकीकडे विद्यार्थ्यांना मनस्ताप होत असताना दुसरीकडे विद्यापीठाची पुनर्मूल्यांकन आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी येणाऱ्या अर्जामधून कमाई वाढते आहे.

* १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत दोन कोटी ३६ लाख ३९ हजार ८८० रुपये पुनर्मूल्यांकन शुल्क विद्यापीठाकडे जमा झाले.

* उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींचे शुल्क विद्यापीठाला १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या वर्षी सहा लाख ७७ हजार ४४० रुपये मिळाले.

* १ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर २०१९ या अवघ्या सहा महिन्यांत एक कोटी ६२ लाख ७४ हजार ६२२ रुपये आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी चार लाख ९० हजार ६७५ रुपये विद्यापीठाला मिळाले आहेत.

उत्तरपत्रिकांचे प्रमाणीकरण करताना होणाऱ्या गोंधळांचा हा परिणाम असू शकतो. विद्यापीठाच्या नियमानुसार आधीच्या निकालात १० टक्के किंवा अधिक बदल असेल तरच पुनर्मूल्यांकनात मूळ निकाल बदलून दिला जातो. त्याचा विचार करता एवढय़ा मोठय़ा प्रमाणात निकालात बदल होणे अपेक्षित नाही.

– प्रा. चंद्रशेखर कुलकर्णी, अधिसभा सदस्य