शालान्त परीक्षेनंतर आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी पालकांच्या उत्पन्नाच्या मर्यादेत शासनाने वाढ केली असून यापुढे ८ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे अधिक विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरू शकणार आहेत.

आर्थिकदृष्टय़ा दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शालान्त परीक्षोत्तर गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना शासनाकडून राबवण्यात येते. ३ हजार २०० विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठीच्या निकषांमध्ये शासनाने नुकतेच बदल केले आहेत.

विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत पन्नास टक्के गुण असल्यास ते या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतील. मात्र सरसकट ही शिष्यवृत्ती देण्यात येणार नसून सर्वोत्तम गुण असलेल्या पहिल्या ३ हजार २०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. यापूर्वी उच्च शिक्षण विभागातील राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीसाठीची उत्पन्न मर्याद वाढवण्यात आली होती. त्याचप्रमाणे आता शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्तीची मर्यादा वाढवण्यात आली आहे.

उत्पन्न मर्यादा आता आठ लाख रुपये

या शिष्यवृत्तीसाठी यापूर्वी पालकांच्या उत्पन्नाची मर्यादा ३० हजार रुपये होती. ती आता आठ लाख रुपये वार्षिक करण्यात आली आहे. पूर्वी उत्पन्नाची मर्याद कमी असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना गुणवत्ता आणि गरज असूनही शिष्यवृत्ती मिळू शकत नव्हती. मात्र मर्यादेत वाढ केल्यामुळे अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची संधी मिळेल.