महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात दलित व बौद्धांवर अत्याचार वाढत आहेत, असा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केला. या वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ पक्षाच्या वतीने येत्या शनिवारी ११ जुलै रोजी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

करोना साथरोगाचा मुकाबला करण्यासाठी राज्यात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात अनेक ठिकाणी दलितांवर हल्ले झाल्याचे; घरे जाळल्याचे; तरुणांच्या हत्या झाल्याचे  प्रकार घडले.  दलित आणि बौद्धांवर वाढत असलेले अत्याचार रोखण्याकडे राज्य सरकार अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. सरकारचा कसलाही धाक राहिलेला नाही. त्यामुळे गुन्हेगारांचे फावत आहे, असे आठवले म्हणाले. राज्यात  दलित व बौद्धांना संरक्षण देण्याच्या मागणीसाठी ११ जुलै रोजी जिल्हा अधिकारी कार्यालय,  तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्यांवर पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात येतील, असे त्यांनी जाहीर केले.