उष्ण लहरींमुळे दोन दिवस मुंबईतील तापमान वाढण्याचा इशारा हवामानशास्त्र खात्याने दिला आहे. मुंबईसह रायगड व रत्नागिरी या भागातील तापमानतही वाढ होईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

भारतीय हवामानशास्त्र खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज आणि उद्या मुंबईसह कोकण, सौराष्ट्र या भागातील तापमान वाढणार आहे. मुंबईत दिवसा तापमान ३८ अंश से. पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मुंबईतील सामान्य तापमानापेक्षा हे प्रमाण ६ अंश से. ने जास्त असल्याचे सांगितले जाते. बुधवारी आणि गुरुवारी तापमानात वाढ होणार असली तरी शुक्रवारी म्हणजे धुलीवंदनाच्या दिवशी तापमानात काही प्रमाणात घट होईल. शुक्रवारी तापमान ३५ अंश से.पर्यंत  राहेल शक्यता वर्तवली जात आहे. फेब्रुवारीत मुंबईत इतके तापमान आजपर्यंत कधीच नव्हते. त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

समुद्राच्या सान्निध्यामुळे कोकण परिसरातील हवा वेगाने तापत नाही. बाष्पयुक्त वारे तापमान नियंत्रणात ठेवतात. त्यामुळे मराठवाडा, विदर्भातील कोरड्या हवेच्या तापमानापेक्षा कोकणातील तापमान नेहमीच कमी असते. मागील दोन दिवसांत मात्र उलट स्थिती आहे. ठाणे ते रत्नागिरी या परिसरात अंतर्गत भागापेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली होती.