भारत हा लोकसंख्या स्फोटाच्या विनाशकारी उंबरठ्यावर उभा असून लोकसंख्या नियंत्रणाबाबत कठोर कायदे करण्याची गरज असल्याचे मत जिंदल उद्योग समुहाचे अध्यक्ष सज्जन जिंदल यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केले आहे. यासंदर्भात आपली भुमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचावी यासाठी त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला सहा ट्विट टॅग केले आहे.

जिंदल म्हणतात, नुकताच काही खासदारांनी लोकसभेत लोकसंख्या नियंत्रण विधेयकाचा मसुदा सादर केला. त्यानंतर त्यांनी देशभरात लोकसंख्या नियंत्रण उपायांच्या अंमलबजावणीबद्दल विचारणा केली. लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रमासाठी ही पहिली पायरी आहे. भारताची लोकसंख्या अमेरिका, इंडोनेशिया, ब्राझिल, पाकिस्तान, बांगलादेश आणि जपान यांच्या एकत्रित लोकसंख्येइतकी आहे. काही अहवाल असे दर्शवतात की, २०३०पर्यंत भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असेल, यामध्ये आपण चीनलाही मागे टाकू.

त्यामुळे देशात सक्तीचे संततीनियमन ही काळाची गरज असून ते करणाऱ्यांना सामाजिक किंवा आर्थिक फायदे मिळवून देणे देशासाठी हितकारक आहे. लोकसभेत मांडलेले लोकसंख्या नियंत्रण विधेयक ही एक सकारात्मक सुरुवात असली तरी, या मुद्द्याला राष्ट्रीय धोरणाचा दर्जा देणे आवश्यक आहे, अशी भुमिकाही जिंदल यांनी ट्विटच्या माध्यमांतून मांडली आहे.