भारतीय भाषांमुळे नेटकऱ्यांची संख्या किंवा इंटरनेट आणि मोबाइल नेट वापरणाऱ्यांची संख्या ही २० कोटींनी वाढली असल्याची माहिती समोर आली आहे. इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात IAMAI या संस्थेने ही माहिती दिली आहे. माहितीचे महाजाल असलेल्या इंटरनेटमध्ये आपल्या आवडीच्या भाषेचा पर्याय भारतीयांना मिळाला. त्यामुळेच नेटकऱ्यांची संख्या २० कोटींनी वाढली आहे असे या संस्थेने म्हटले आहे. इंटरनेट इन इंडिक २०१७ या नावाने या संस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात त्यांनी ही नोंद केली.

भारतातील ४८ कोटी इंटरनेट युजर्समध्ये ३३ कोटींपेक्षा जास्त युजर्स असे आहेत जे युनिक युजर्स नाहीत. या ३३ कोटीपेक्षा जास्त युजर्समध्ये १९ कोटी पेक्षा जास्त नेटकरी हे शहरी भागातील तर १४ कोटी पेक्षा जास्त युजर्स हे ग्रामीण भागातील आहेत असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम नेटकरी इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात असेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. रंजक माहिती मिळवण्याकडे या युजर्सचा कल दिसून येतो आहे. आपल्या आवडत्या भाषेत इंटरनेटवर माहिती मिळण्याचा पर्याय उपलब्ध झाल्याने भारतात नेटकऱ्यांचे प्रमाण वाढल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

शहरी भागात इंटरनेटचा उपयोग मनोरंजन क्षेत्रासाठी जास्त होतो, उदाहरणार्थ शहरी भागात म्युझिक व्हिडिओ किंवा लाइव्ह स्ट्रिमिंग, सिनेमा हे जास्त पाहिले जाते. तर ग्रामीण भागातले लोकही यामध्ये मागे नाहीत. नेटकरी फक्त इंडिक अर्थात भारतीय भाषांचा वापर करत नाही मात्र त्यांच्या वापरताला एक भागा भारतीय भाषाही असतो असेही या अहवालात म्हटले आहे.