लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : भारतीय साहित्य परदेशी नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या प्रकल्पांतर्गत दहा भारतीय पुस्तकांचा अनुवाद चीनी आणि रशियन भाषांमध्ये करण्यात आला आहे. यात आसामी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, उडिया, पंजाबी, तमिळ, तेलगु, उर्दू या भाषांतील साहित्याचा समावेश आहे. ३० नोव्हेंबरला झालेल्या एससीओ परिषदेत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी या संदर्भातील घोषणा के ली.

जून २०१९ मध्ये बिश्के क येथे झालेल्या एससीओ शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय भाषांतील १० महान साहित्यकृतींचा  रशियन आणि चीनी भाषेत अनुवाद के ला जाईल, अशी घोषणा के ली होती. त्यानुसार साहित्य अकादमीने १० साहित्यकृतींची निवड करून त्यांच्या अनुवादाचे काम हाती घेतले होते. दोन देशांतील सर्वोत्तम साहित्याची देवाण-घेवाण व्हावी, असा या उपक्रमाचा उद्देश आहे. १० नोव्हेंबरला एससीओंसोबत झालेल्या आभासी बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी अनुवादाचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाल्याची घोषणा केली.

सोमवारी उपराष्ट्रपती नायडू यांनी एससीओंसोबत बैठक घेऊन या घोषणेचा पुनरूच्चार के ला. अनुवादित साहित्यामुळे प्राचीन आणि समृद्ध भारतीय परंपरेविषयी परदेशी नागरिकांमध्ये कु तूहल निर्माण होईल, असा आशावाद नायडू यांनी व्यक्त के ला. अनुवाद करण्यात आलेल्या साहित्यकृतींमध्ये सय्यद अब्दुल मलिक यांच्या सुरजमुखीर स्वप्न(आसामी), ताराशंकर बंडोपाध्याय आरोग्यनिके तन (बंगाली), जव्हेरचंद मेघानी यांचे वेविशल (गुजराती), निर्मल वर्मा यांचे कव्वे और काला पानी (हिंदी), एस. एल. भैरप्पा यांचे पर्व (कन्नड), मनोज दास यांचे मनोज दासांका कथा ओ काहिनी (उडिया), गुरूदाल सिंग यांचे म्हारी दा दिवा (पंजाबी), जयकांथन यांचे सिला निरांगलील सिला मनीथरगल (तमिळ), रचकोंदा विश्वनाथ शास्त्री यांचे इलू (तेलुगू) व राजिंदर सिंग बेदी यांचे एक चादर मली सी (उर्दू) यांचा समावेश आहे.

पुढील टप्प्यात मराठी

या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात मराठी साहित्यकृतीला स्थान मिळालेले नाही. मात्र, हा उपक्रम असाच सुरू राहणार असल्याने पुढील टप्प्यात मराठी साहित्यकृतींचा परदेशी भाषेत अनुवाद होण्याची शक्यता आहे.