अमेरिकी अर्थव्यवस्थेतील बिघाडाचे हादरे गेली अडीच-तीन वर्षे सोसत आलेल्या भारताच्या भांडवली आणि चलन तसेच सराफ बाजारात, गुरुवारी अमेरिकेतील आर्थिक सुधाराच्या संकेतानेही धरणीकंप व्हावा असे भयाण हादरे देणारे पडसाद उमटले. अमेरिकेची मध्यवर्ती बँक- फेडरल रिझव्‍‌र्हने दरमहा ८५ अब्ज डॉलरच्या रोखे खरेदीसारख्या अर्थउभारीचा कार्यक्रमापासून फारकत घेत असल्याच्या जवळपास अपेक्षित घोषणेवर उमटलेल्या या प्रतिक्रियेने, भारतीय चलन रुपयाची प्रति डॉलर ६० या सार्वकालिक नीचांकापर्यंत, तर भांडवली बाजारात सेन्सेक्सच्या ५२६ या दोन वर्षांतील सर्वात मोठय़ा गटांगळीची भयानकता गुंतवणूकदारांना दाखवून दिली.
अमेरिकेतील घडामोडींवर चलन बाजारात अस्थिरता निर्माण व्हावी अशी प्रतिक्रिया अनाठायी असल्याचे गुरुवारी सकाळीच देशाचे मुख्य अर्थ-सल्लागार रघुराम राजन यांनी पत्रकार परिषद घेऊन निर्वाळा दिला. चलन बाजाराचे व्यवहार सुरू होताच सकाळच्या सत्रातच रुपया डॉलरच्या तुलनेत ६० च्या गाळात ढेपाळताना कालच्या तुलनेत तब्बल १३० पैशांनी घसरत नव्या नीचांकाला पोहोचला. विशेषत: डॉलररूपी विदेशी गुंतवणूक माघारी परतत असल्याच्या परिणामी प्रारंभीच दणक्यात आपटी घेऊन खुल्या झालेल्या शेअर बाजाराने रुपयाला आणखीच कमकुवत बनविले. गुंतवणूकदारांचा थरकाप उडवून देणाऱ्या या धक्क्यांना शांत करण्यासाठी राजन यांची पत्रकार परिषद सुरू असताना, सरकारी रोखे बाजारातील घसरणीने खालचे सर्किट गाठले आणि हे व्यवहार अपरिहार्यपणे काही काळ बंद ठेवावे लागले.
फेडच्या निर्णयाचे पडसाद वस्तू बाजारातही उमटले. सोने-चांदी या सर्वाधिक आयात होणाऱ्या मौल्यवान धातूंची झळाळी आंतरराष्ट्रीय बाजारात कमालीची फिकटताना दिसली, तर दोन दिवसांपूर्वी प्रति पिंप १०६ अमेरिकी डॉलरला पोहचलेले कच्चे तेल १०३ डॉलरवर उतरले. सोन्या-चांदीचे भाव गडगडले असले तरी गेल्या दीड महिन्यात रुपयाची डॉलरच्या तुलनेत १० टक्क्यांच्या गटांगळीने त्याचे लाभ मात्र अर्थव्यवस्थेला मिळू शकणार नाहीत.  एकाच दिवसात निर्देशांकात सव्वा पाचशे अंशांची घसरण नोंदविणाऱ्या शेअर बाजारात गुंतवणूकदारांच्या खिशाला जबर झळ बसली.

महागाईत आणखी भर पडणार
घाऊक किंमत निर्देशांकासह किरकोळ महागाई दर सावरत असल्याचे चित्र दिसत असतानाच रुपयातील घसरणीमुळे आता महागाईवर अधिक दबाव निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मान्सूनमुळे अन्नधान्याच्या किमती कमी होणार असल्या तरी चलन अस्थिरतेपोटी आंतरराष्ट्रीय वायदे वस्तूंच्या किमती भारतातील एकूण महागाईवर विपरीत परिणाम करण्याची साशंकता आहे. वाढती महागाई हेरून रिझव्‍‌र्ह बँकेने यंदाही व्याजदर कपात टाळली होती.

आयात वस्तू महागणार
रुपया घसरल्याने डॉलरचे मूल्य उंचावले आहे. परिणामी देशाबाहेर अधिक चलन मोजून होणारे व्यवहार देशात होताना त्याची वसुली करतील. अर्थातच यामुळे आयात करावे लागणाऱ्या वस्तू महागडय़ा ठरणार आहेत. एलजीने विविध उत्पादनांच्या किमती वाढविल्यानंतर आता सोनी, सॅमसंग, ब्ल्यू स्टार यांनीही दरवाढीचे संकेत दिले आहेत. एसी, वॉशिंग मशीन, फ्रिज, टीव्हीसह कॉम्प्युटर, लॅपटॉप, नोटबुक, आयपॅडच्या किमतीही १० टक्क्यांनी महागण्याची शक्यता आहे.

भारतावर ‘सार्वकालिक’ परिणाम
घसरत्या रुपयाचा परिणाम आता देशांतर्गत विविध बाबींवर होणार याबाबत नि:संशयतेने बोलले जात आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे घसरणे चालू खात्यातील तुटीवर दबाव निर्माण करण्याबरोबरच वाढत्या महागाईत इंधन घालणारे ठरणार आहे. दरम्यान, भक्कम होत असलेल्या डॉलरचा फायदा होणाऱ्या निर्यातदारांनी ‘रुपयातील घसरण हे वाईट वृत्त असून आमच्या व्यवसायावरही अस्थिरता आणणारे आहे’ अशी अनोखी प्रतिक्रिया दिली आहे.