माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांची मुलगी असल्याचा दावा करणाऱ्या प्रिया पॉल यांनी सध्या चर्चेत असलेल्या दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या ‘इंदू सरकार’ या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हा सिनेमा येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याच्या मुख्य मागणीसह या चित्रपटातील नेमक्या कोणत्या घटना काल्पनिक आणि वास्तव आहेत याचे स्पष्टीकरण भांडारकर यांनी द्यावे, अशी मागणीही पॉल यांनी याचिकेद्वारे केली आहे. इंदिरा सरकारने लादलेल्या आणीबाणीवर हा चित्रपट आधारित असला तरी त्यातील केवळ ३० टक्के भागच वास्तव घटनांशी संबंधित असून उर्वरित भाग काल्पनिक आहे, असे भांडारकर यांनी नुकतेच स्पष्ट केले होते. एवढेच नव्हे, तर हा चित्रपट बहुतांशी काल्पनिक घटनांवर आधारित असल्याची सूचना चित्रपटापूर्वी देण्याची तयारी भांडारकर यांनी दाखवली होती. परंतु चित्रपटातील वास्तव घटनांशी संबंधित भाग वगळला जात नाही, तोपर्यंत चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यात यावी.

तसेच सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला दिलेले प्रमाणपत्रही रद्द करावे, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.  त्याची सुनावणी २४ जुलै रोजी ठेवण्यात आली आहे.