अखिल भारतीय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे धास्तावलेल्या भाजप सरकारचा त्यांचे निवासस्थान व सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय म्हणजे केंद्रातील सत्ताधारी भाजपचे हीन राजकारण आहे, अशी खरमरीत टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

या संदर्भात थोरात म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकारने प्रियांका गांधी यांची सुरक्षा आणि निवासस्थान काढून घेणे हे दुर्दैवी आहे. प्रियांका यांनी आपली आजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी यांचा भयानक मृत्यू पाहिला आहे. आजही गांधी कुटुंबावरील हा धोका टळलेला नसताना सुरक्षा व निवासस्थान काढून घेणे हे भाजपचे हीन राजकारण आहे.

प्रियांका गांधी यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे धास्तावलेले भाजप सरकार त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, पण अशा कृतींना प्रियंका गांधी व काँग्रेस पक्ष भीक घालणार नाही. यापुढेही जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवत राहू, असा इशाराही त्यांनी दिला.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी हे सातत्याने भाजप सरकारच्या चुकीच्या निर्णयाबद्दल जाब विचारत आहेत. त्यामुळे भाजपची कोंडी होत असून त्यांनी प्रश्न विचारू नयेत म्हणूनच त्यांच्यावर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न आहे. सरकारला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे नाहीत म्हणून अशी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप सरकार करत आहे. भाजप सरकारने अशा प्रकारे कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी प्रियांका व राहुल गांधी हे जनतेच्या हितासाठी सरकारला प्रश्न विचारतच राहतील, सामान्य जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष करत राहतील असे थोरात यांनी म्हटले आहे.