कपिल वाधवान यांच्या रिमांड अर्जातील माहिती

मुंबई: तस्कर इक्बाल मेमन ऊर्फ इक्बाल मिरची याच्याशी संबंधित तीन मालमत्ता खरेदी केल्याप्रकरणी सक्तवसुली महासंचालनाने दिवाण हाऊसिंग फायनान्स लि.चे (डीएचएफएल) अध्यक्ष व व्यवस्थापैकीय संचालक कपिल वाधवान यांना अटक केल्यानंतर त्यांच्या २१०० कोटी रुपयांचा बेनामी व्यवहार उघड झाला आहे. या प्रकरणी आता अधिक चौकशी सुरू करण्यात आली आहे.

वाधवान यांना बुधवारपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्या रिमांड अर्जात २१०० कोटींच्या बेनामी व्यवहाराची माहिती देण्यात आली आहे. यापैकी २२५ कोटी इक्बाल मिरचीशी संबंधित वरळीतील तीन मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापर करण्यात आल्याची माहिती याआधीच्या तपासातूनही उघड झाली होती. मात्र उर्वरित बेनामी व्यवहाराबाबत समाधानकारक माहिती न मिळाल्याने वाधवान यांना अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

२०१० व ११ या काळात डीएचएफएल या कंपनीतून सुमारे २१०० कोटी रुपये पाच बेनामी कंपन्यांमध्ये वळते करण्यात आले होते. फेथ रिएल्टर्स (६८५ कोटी), मार्वेल रिएल्टर्स (५१० कोटी), एबल रिएल्टी (२१५ कोटी), पोझीडॉन रिएल्टर्स (३९२ कोटी) आणि रँडम रिएल्टर्स (३५३ कोटी) अशी या कंपन्यांची नावे आहेत. या कंपन्या नंतर सनब्लिंक रिएल इस्टेट या कंपनीत विलीन करण्यात आल्या. ‘सनब्लिंक‘ मार्फत मिरचीशी संबंधित मालमत्ता खरेदी करण्यात आल्या. त्यासाठी २२५ कोटी रुपये खर्च करण्यात आल्या. उर्वरित बेनामी व्यवहाराबाबतही अधिक चौकशी सक्तवसुली महासंचालनामार्फत सुरू असून त्यातून काही महत्त्वाची माहिती उघड झाली आहे. मात्र त्याबाबत खात्री करण्यासाठी वाधवान यांची चौकशी केली जात आहे. याबाबत अधिक माहिती देण्यास सूत्रांनी नकार दिला. वाधवान यांच्या इक्बाल मिरचीच्या कथित मालमत्ता खरेदीशी संबंध असल्याची माहिती वर्षभरापूर्वी उघड झाली होती. मात्र या याबाबत विविध व्यवहारांची शहानिशा सुरू असल्याचेही या सूत्रांनी सांगितले.

झाले काय?

२०१०-११ या काळात ‘डीएचएफएल’ या कंपनीतून सुमारे २१०० कोटी रुपये पाच बेनामी कंपन्यांमध्ये वळते करण्यात आले होते. फेथ रिएल्टर्स (६८५ कोटी), मार्वेल रिएल्टर्स (५१० कोटी), एबल रिएल्टी (२१५ कोटी), पोझीडॉन रिएल्टर्स (३९२ कोटी) आणि रँडम रिएल्टर्स (३५३ कोटी) अशी या कंपन्यांची नावे आहेत. या कंपन्या नंतर सनब्लिंक रिअल इस्टेट या कंपनीत विलीन करण्यात आल्या. ‘सनब्लिंक’मार्फत मिरचीशी संबंधित मालमत्ता खरेदी करण्यात आल्या. त्यासाठी २२५ कोटी रुपये खर्च करण्यात आले. उर्वरित बेनामी व्यवहाराबाबतही अधिक चौकशी सक्तवसुली महासंचालनामार्फत सुरू असून त्यातून काही महत्त्वाची माहिती उघड झाली आहे. मात्र त्याबाबत खात्री करण्यासाठी वाधवान यांची चौकशी केली जात आहे. याबाबत अधिक माहिती देण्यास सूत्रांनी नकार दिला.