ठाण्याजवळील कोपरी येथील पूल पाडण्याचे काम विशेष ब्लॉक घेऊन करण्याचा निर्णय झाल्यानंतरही बुधवारी मध्यरात्री या पुलावरून लोखंडी पत्र्याचा काही भाग खाली पडला. हा भाग थेट मोटरमनच्या खिडकीवर पडल्याने ती खिडकी तुटून मोटरमन जखमी झाला. मात्र प्रसंगावधान दाखवत त्याने गाडी ठाणे स्थानकात आणली. ठाणे स्थानकातून या मोटरमनला थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि ही गाडी रद्द करण्यात आली. गेल्या दोन महिन्यांतील ही दुसरी घटना आहे. बुधवारी रात्री ११.२० वाजता मुंबईहून टिटवाळ्यासाठी निघालेली गाडी १२.१५च्या सुमारास कोपरी पुलाखालून जात होती. या वेळी अचानक पुलाचा एक लोखंडी पत्रा निखळून थेट गाडीवर पडला. या अपघातात मोटरमन कोतुरवार यांना दुखापत झाली. कोतुरवार यांनी प्रसंगावधान राखत गाडी ठाणे स्थानकात आणून थांबवली आणि त्यानंतर त्यांना ठाण्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.