‘प्रगत शैक्षणिक कार्यक्रमा’अंतर्गत घेण्यात येणाऱ्या इंग्रजी व गणित या विषयांच्या चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका आदल्या दिवशीच फुटल्याचे स्पष्ट झाल्यावर गुरुवारी महापालिकेच्या शिक्षण विभागाने या गंभीर प्रकाराला चौकशीची मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला. मात्र जिथून या प्रश्नपत्रिका विद्यार्थी-पालकांना उपलब्ध होत होत्या, अशा ठिकाणी चौकशी करण्याऐवजी भलत्याच शिक्षकांना गाठून पालिकेचे अधिकारी दिवसभर विचारणा करीत राहिले. थोडक्यात, पेपरफुटीच्या प्रकरणावरही थातुरमातुर चौकशीचे पांघरूण घातले जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

मुंबईत ठिकठिकाणी फोटोकॉपी करणाऱ्या व्यावसायिकांकडे आदल्या दिवशीच अवघ्या २० ते ४० रुपयांना इंग्रजी व गणित विषयाच्या प्रश्नपत्रिका विकल्या जात असल्याचे ‘लोकसत्ता’ने २० ऑक्टोबरला वृत्ताद्वारे उघडकीस आले होते. आज म्हणजे गुरुवारी होणाऱ्या ‘गणित’ या विषयाची इयत्ता सातवीची प्रश्नपत्रिका आदल्या दिवशीच एका जागरूक पालकामुळे ‘लोकसत्ता’च्या हाती लागली होती. ही आणि गुरुवारी झालेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका सारखीच होती. या प्रकारामुळे महाराष्ट्र शैक्षणिकदृष्टय़ा ‘प्रगत’ करण्याच्या उद्देशाने १२५ कोटी रुपये खर्चून शालेय शिक्षण विभागातर्फे राज्यभर राबविल्या जाणाऱ्या या कार्यक्रमाचा फज्जा उडाल्याचे स्पष्ट होत आहे.

वृत्तपत्रांतील माहितीनंतर चौकशी

‘महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद’ या शालेय शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या यंत्रणेच्या देखरेखीखाली राज्यभरातील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता या चाचण्या घेतल्या जातात. त्या एकाच दिवशी सर्व शाळांमध्ये होणे आवश्यक आहे. पालिकेकडे त्याच्या आयोजनाची जबाबदारी आहे. म्हणून वृत्तपत्रांत पेपरफुटीविषयी वाचल्यानंतर आम्ही चौकशी करण्याकरिता आमच्या अधिकाऱ्यांना पाठविल्याचे पालिकेचे शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी सांगितले.