News Flash

‘आय.एन.एस. खांदेरी’ पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात लवकरच

‘पाणबुडीच्या सर्वोच्च क्षमतेपर्यंत या चाचण्या घेतल्या असून त्या अत्यंत यशस्वी झाल्या आहेत.

मुंबई : संपूर्ण भारतीय बनावटीच्या, अद्ययावत अशा ‘आय.एन.एस. खांदेरी’ पाणबुडीच्या सर्व चाचण्या यशस्वीपणे पार पडल्या असून २८ सप्टेंबरला ती नौदलाच्या ताफ्यात दाखल होईल. कलवरी श्रेणीतील ही दुसरी पाणबुडी असून डिझेल-विद्युत प्रकारातील सर्वात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये करण्यात आला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत शनिवारी मुंबईतील गोदीत ‘खांदेरी’ नौदलाच्या ताफ्यात समारंभपूर्वक दाखल होईल.

कलवरी श्रेणीतील सहा पाणबुडय़ा बांधण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. त्याअंतर्गत ही दुसरी पाणबुडी नौदलात दाखल होत आहे. या पाणबुडीची बांधणी माझगाव डॉकने केली आहे. सध्या नौदलाकडील पाणबुडींची संख्या मर्यादित असून खांदेरीमुळे नौदलाच्या सामरिक ताकदीत वाढ होईल. पी १७ प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणाऱ्या ‘स्कॉर्पिअन’ या फ्रेंच तंत्राधारित उर्वरित चार पाणबुडी २०२३ पर्यंत नौदलात दाखल होतील असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘खांदेरी’च्या बांधणीचे काम एप्रिल २००९ मध्ये सुरू करण्यात आले, मध्यंतरी काही काळ फ्रेंच उत्पादकांच्या पुरवठा साखळीतील अडचणींमुळे बांधणीस काही काळ विलंब झाला. जून २०१७ पासून ऑगस्ट २०१९ पर्यंत तिच्या चाचण्या घेण्यात आल्या.

‘पर्मासिन मोटार’ या अद्ययावत तंत्राचा वापर केल्यामुळे ही पाणबुडी समुद्रातून जात असताना तिचा आवाजच येणार नाही. परिणामी शत्रूला चकवा देणे शक्य होईल असा विश्वास नौदल अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर अंतर्गत यंत्राचा आवाज बाहेर जाणारच नाही अशी यंत्रणादेखील यामध्ये कार्यरत आहे. खांदेरीवरील यंत्रणा स्वयंचलित आहे,  त्यामुळे नौसैनिक-अधिकाऱ्यांची आवश्यकता निम्माने कमी झाली आहे. खांदेरी पाणबुडीमध्ये निर्णायक क्षणी सुटका करण्यासाठी कॉफरडॅम ही संकल्पना वापरण्यात आली आहे. निर्णायक क्षणी पाणबुडी सोडून बाहेर पडायचे असेल तेव्हा कॉफरडॅमच्या वापरामुळे पाणबुडीचा नियंत्रण कक्ष आणि इंजिन यामध्ये एक स्वतंत्र जागा उपलब्ध होते. त्यानंतर हॅचद्वारे पाणबुडी सोडून बाहेर पडता येते.

‘पाणबुडीच्या सर्वोच्च क्षमतेपर्यंत या चाचण्या घेतल्या असून त्या अत्यंत यशस्वी झाल्या आहेत. क्षेपणास्त्रे आणि पाणतीर (टॉर्पेडो) यांच्या क्षमतेची परमोच्च बिंदूपर्यत चाचणी घेतली आहे. संपूर्णपणे देशातच बांधलेल्या आणि सर्वात प्रगत अशा या पाणबुडीचे नेतृत्त्व करण्याचा मला अभिमान आहे,’ असे या पाणबुडीचे नेतृत्व करणाऱ्या कॅप्टन दलबीर सिंग यांनी सांगितले. कॅप्टन दलबीर सिंग २० वर्षांपासून वेगवेगळ्या पाणबुडींवर कार्यरत असून यापूर्वी त्यांनी ‘सिंधूघोष’ या पाणबुडीचे नेतृत्व केले होते.

* अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वापराने मनुष्यबळ निम्म्यावर

* ३६० बॅटरींचा वापर (प्रत्येकी ७५० किलो वजन)

* पर्मासिन मोटरच्या वापरामुळे आवाजच नाही

* ४ पाणतीर (टॉर्पेडो), २ क्षेपणास्त्रे डागण्याची यंत्रणा

* ताशी २० नॉटिकल मैल वेगाने जाण्याची क्षमता

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2019 4:45 am

Web Title: ins khanderi submarine soon in navy zws 70
Next Stories
1 म्हाडा अधिकाऱ्यांची स्वयंघोषित आचारसंहिता!
2 पवार यांच्याविरुद्ध तक्रारदाराचा जबाब हीच तक्रार!
3 शरद पवारांच्या पवित्र्यामुळे ‘ईडी’समोर पेच!
Just Now!
X