निशांत सरवणकर

विमा नियामक प्राधिकरणाचा मसुदा जारी

मानसिक आरोग्य विधेयकानुसार मनोविकारांसाठी विमा संरक्षण देण्याचा स्पष्ट आदेश विमा नियामक आयोगाने दिल्यानंतरही त्याची अंमलबजावणी करण्यात कंपन्यांनी टाळाटाळ केली आहे. याची गंभीर दखल घेत विमा नियामक प्राधिकरणाने अखेर नियमावली जारी केली असून, त्यानुसार आता मनोविकारांचाही विमा संरक्षणात उल्लेख करावा लागणार आहे. याबाबतचा मसुदा हरकती व सूचनांसाठी प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

एका आकडेवारीनुसार, भारतात मनोरुग्णांची संख्या सात कोटींच्या घरात आहे. प्रदीर्घ काळ चालणाऱ्या उपचारासाठी लागणारा खर्च कुटुंबाच्या आवाक्याबाहेर जात असतानाही विमा कंपन्यांनी या आजाराला विमा संरक्षण नाकारले होते. मानसिक आरोग्य विधेयकात त्याबाबत उल्लेख होता. तरीही प्रत्यक्षात कृती होत नव्हती. काही विमा कंपन्यांनी रस दाखविला असला तरी त्या भरमसाट अतिरिक्त हप्ता आकारण्याच्या तयारीत होत्या. विमा कंपन्यांनी मानसिक आजारांसाठी विमा संरक्षण उपलब्ध करून द्यावे, असे स्पष्ट आदेश विमा नियामक आयोगाने १६ ऑगस्ट २०१८ मध्ये परिपत्रक काढून दिले. तरीही त्याबाबत कंपन्यांकडून टाळाटाळ केली जात असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

या प्रकाराची प्राधिकरणाने दखल घेतली असून १६ मे रोजी मसुदा जारी केला आहे. या मसुद्यानुसार सर्व विमा कंपन्यांना आता विमा संरक्षण देताना जारी करावयाच्या प्रमाणपत्रातील अटी व शर्तीमध्ये काय टाळता येणार नाही, याची जंत्रीच दिली आहे. त्यामध्ये मनोविकारांचा समावेश करण्यात आला आहे. याआधी मनोविकारांना विमा संरक्षण लागू नाही, असा उल्लेख या प्रमाणपत्रात आढळत होता. तसा आता त्यांना करता येणार नाही. त्यामुळे या कंपन्यांना आता मनोविकारांना विमा संरक्षण देणे बंधनकारक आहे. याशिवाय विमा संरक्षण घेतल्यानंतर होणारा विकार, घातक कारवायांमध्ये झालेला विकार किंवा जखम, कृत्रिम जैवरक्षक यंत्रणा, वृद्धत्वामुळे होणारे आजार आदींचाही त्यात समावेश करण्यात आला आहे.

विमा संरक्षण का हवे?

मानसिक आजारांनी ग्रस्त रुग्णांमध्ये स्किझोफ्रेनिया, बायपोलर, ऑब्सेशन कम्पल्शन डिसऑर्डर (ओसीडी) रुग्णांवर इलेक्ट्रोकन्वल्सिव्ह थेरपी म्हणजेच शॉक ट्रीटमेंट हा एक प्रभावी उपचार आहे.

याशिवाय रिपिटिटिव्ह ट्रान्सफॅ निअल मॅग्नेटिक (आरटीएमएस) तसेच थीटा बर्स्ट आदी उपचार उपलब्ध आहेत. देशातील सात कोटींपैकी ३५ लाख रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागते. परंतु उपचारांची सोय केवळ ४० रुग्णालयांत असून त्यात फक्त २६ हजार खाटा आहेत. सरकारी रुग्णालयातील परिस्थिती आशादायक नसल्यामुळे खासगी उपचारांशिवाय पर्याय नसतो. मात्र हे सर्व उपचार खर्चीक आहेत.

कर्करोग, हृदयरोगासह बहुतांश सर्वच रोगांना विमा संरक्षण आहे. मनोविकार हे मेंदूशी संबंधित आहेत. मेंदू हा शरीराचा भाग नाही का? प्रत्यक्षात मनोविकार कुटुंबाचे आर्थिक गणित जितके बिघडवतो, तेवढा अन्य कुठलाही आजार नाही. त्यामुळे मानसिक आजारांना विमा संरक्षण आवश्यक आहे. या मसुद्यामुळे ते विमा कंपन्यांना बंधनकारक होईल.

– डॉ. संदीप जाधव, मानसोपचारतज्ज्ञ