उद्धव ठाकरे यांचे आवाहन; ‘रोअर’ छायाचित्र पुस्तकाचे प्रकाशन

निसर्ग, वन्यप्राणी आणि वन्यजीवन हा आपला अमूल्य ठेवा असून त्याच्या जतन आणि संवर्धनाच्या कामात प्रत्येकाने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुंबईत केले.

सेंच्युरी फाऊंडेशनतर्फे नरिमन पॉइंट येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ठाकरे यांच्या हस्ते कमल मोरारका यांच्या ‘रोअर’ या वन्यप्राणी व वन्यजीवनावरील छायाचित्रांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर ते बोलत होते. सोहळ्यास मोरारका यांच्यासह प्रीतीश नंदी, बिट्टू सहेगल उपस्थित होते.

निसर्ग, वन्यप्राणी आणि वन्यजीवन हे आपले वैभव आहे. आपण एखादे झाड लावले नाही तरी चालेल पण असलेली झाडे तोडू नका. विकासाच्या नावावर आपण पर्यावरण, जंगले नष्ट करत असून ते रोखणे आवश्यक आहे. अन्यथा भावी पिढीला वाघ, जंगल हे फक्त छायाचित्रातच पाहावे लागेल, असेही ठाकरे यांनी सांगितले.

जंगलातून वाघीण चालली आहे आणि वाघांनी तिची छेडछाड केली असे कधीही पाहायला मिळत नाही.

पण माणसांकडून मात्र छेडछाड घडते. आपण जंगलातल्या प्राण्यांना पशू म्हणतो पण खरे पशू तर आपण माणसेच आहोत. जंगलातल्या प्राण्यांनी माणसांमधील या पशूंवर पुस्तक लिहिले पाहिजे, असे ठाकरे म्हणाले.

नंदी यांनी सांगितले, मोरारका यांनी पुस्तकातून वन्यप्राणी आणि वन्यजीवनाचे वैभव खुले केले आहे. ते पाहून सध्याच्या काळात आपण काय गमावत आहोत याची जाणीव होते. त्यादृष्टीनेही हे पुस्तक महत्त्वाचे आहे. तर बिट्टू सहेगल यांनी जंगलांशिवाय जीवन व्यर्थ आहे. निसर्गाचा नाश म्हणजे पर्यायाने मानवाचा नाश असे सांगितले.

‘मित्रो’ची भीती

भाषणाची सुरुवात मराठीत बंधूनो आणि भगिनींनो अशी केली तर काही वाटत नाही. पण हिंदीतून बोलताना मात्र पंचाईत होते. कारण ‘भाईयो’, ‘मित्रो’ असे म्हटले की हल्ली लोक पळून जातात. वाघाला जितके घाबरत नाही तितके लोक आता या शब्दांना घाबरायला लागले आहेत, असा टोला ठाकरे यांनी कोणाचेही नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.