संतुलन हा निसर्गाचा मूलभूत नियम आहे. त्यामुळेच आपण निसर्गाकडून काय घेतो आणि त्याला काय परत देतो त्यावरून पर्यावरणाची स्थिती ठरते. पाणी आणि सांडपाण्याचे चक्र हे याचे प्रातिनिधिक उदाहरण. एकीकडे निसर्गाकडून शुद्ध स्वरूपातील पाणी मिळवायचे आणि ते अत्यंत दूषित करून पुन्हा गटारे, नाले यातून निसर्गाला परत करायचे. त्यानंतर पुन्हा पुढच्या वर्षी शुद्ध पाणी मिळण्याची अपेक्षा ठेवायची.. एवढा स्वार्थीपणा माणसेच करू शकतात.
सध्या पाणी आणि कचरा हे दोन्ही विषय चच्रेत आहेत. पाणी अपुरे आहे म्हणून आणि कचरा मर्यादेपलीकडे वाढलाय म्हणून. याच अनुषंगाने विषय येतो आहे तो सांडपाण्याचा. आíथक राजधानी असल्याने मुंबईला एवढय़ा वर्षांत पाण्याची कमतरता मुळी जाणवलेलीच नाही. या वेळीही राज्यातील इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा मुंबईकर पाण्याच्या बाबतीत श्रीमंत आहे. मात्र राज्यातील दुष्काळाची भयाण स्थिती पाहता सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील पाण्याचा मुद्दा पुढे आला आणि त्यानंतर याबाबतीतील आपली धोरण दिरंगाईही. मुंबईला दररोज साडेतीन लाख दशलक्ष लिटरचा पुरवठा होतो. त्यातील अडीच लाख दशलक्ष लिटर पाण्याचे प्रदूषण करून आपण ते सांडपाणी समुद्रात सोडतो. आंघोळ, कपडे, भांडी धुणे, स्वयंपाकघरातील पाणी, शौचालय, साफसफाई असे सर्व पाणी गटारातून मुख्य सांडपाणी वाहिनीत जाते. या पाण्यातील नायट्रेट, फॉस्फेट आणि जैविक घटक हे पाण्यातील शेवाळांसाठी खाद्यच. एवढी चंगळ झाल्यावर समुद्रातील शेवाळांचे प्रमाण वाढते. जगण्यासाठी हे शेवाळ पाण्यातील ऑक्सिजन शोषून घेतात आणि त्यामुळे इतर समुद्रीजिवांवर तडफडून मरण्याची वेळ येते. औद्योगिक कारखान्यांमधून बाहेर येणाऱ्या पाण्यामुळे होणारे परिणाम त्यापेक्षाही भयंकर. हे प्रदूषण रोखण्यासाठी जागतिक स्तरावरून दबाव सुरू झाल्यावर आणि जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्यातून अखेर दहा वर्षांनंतर आपल्याकडे मालाड, वरळी व वांद्रे येथील सांडपाणी समुद्रात एक ते तीन किलोमीटर आतापर्यंत सोडण्याची व्यवस्था करण्यात आली. पण हे म्हणजे कचरा अंगणात टाकण्यापेक्षा मागच्या दाराला टाकण्यासारखेच आहे. आपण दुर्लक्ष केले तरी इतर देश मात्र या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहतात. त्यामुळेच एकीकडे सांडपाण्यामुळे समुद्रातील जीवसृष्टी धोक्यात (माशांमुळे ते प्रदूषण आपल्याही ताटात येते) आणि दुसरीकडे शुद्ध पाण्याचा तुटवडा या दोन्हींवर जगात पाच दशकांपूर्वी उपाय शोधला गेला. तो म्हणजे सांडपाणी प्रक्रिया केंद्राचा.. सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्यातील हानिकारक घटकांचे प्रमाण कमी करायचे आणि ते पुन्हा वापरण्याजोगे करायचे. अनेक राष्ट्रांमध्ये हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. सिंगापूरमध्ये तर हे पाणी पिण्याएवढे शुद्ध केले जाते, एवढेच नव्हे तर सिंगापूरच्या एकूण पाणीपुरवठय़ाच्या तीस टक्के पाणी हे प्रक्रिया केलेले सांडपाणी असते.
मुंबई शहरात सध्या तीन केंद्रांमधून पाण्यावर प्रक्रिया केली जाते. पण त्याचे प्रमाण म्हणजे समुद्रातील एक थेंबच. रोजच्या अडीच लाख दशलक्ष लिटर पाण्यामधून साडेपाच दशलक्ष लिटर पाणी पुन्हा मिळवले जाते. म्हणजे ०.००२२ टक्के. मुंबई सांडपाणी व्यवस्थापक प्रकल्पाच्या माध्यमातून हे केलेय, पण पंधरा वर्षे उलटूनही दुसरा टप्पाच धड सुरू झालेला नाही. या दुसऱ्या टप्प्यांतर्गत कुलाबा, वरळी, वांद्रे, वर्सोवा, मालाड, भांडुप आणि घाटकोपर या ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्रे सुरू करायची आहेत. २००१ मध्ये या प्रकल्पाची किंमत १८५१ कोटी रुपये होती. ती आता वाढून ५४०० कोटी रुपये झाली आहे. जमिनीची उपलब्धता, खारफुटी, जंगल, पर्यावरण, सागरी किनारा यांच्याकडून लागणाऱ्या परवानगी व न्यायालयीन प्रक्रिया या सगळ्यात कोणत्याही ठिकाणचे काम सुरू झालेले नाही. दरम्यानच्या काळात मुंबईतील सांडपाण्याचे प्रमाण मात्र वाढले आहे. त्यामुळे आता या केंद्रांची क्षमता वाढवूनच त्यांची अंमलबजावणी करण्याची वेळ येणार.
प्राजक्ता कासले prajakta.kasale@expressindia.com