मागील पाच वर्षात ज्या मुद्द्यांवर लढलो त्यापेक्षा दहापट ताकदीने माझी लढाई लढणार असल्याचं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. पत्रकार आणि सामाजिक विचारवंत गौरी लंकेश यांच्या हत्येमागे संघ विचारसरणीचा हात असल्याचं ट्विट राहुल गांधी यांनी केलं होतं. त्यावरून राहुल गांधींविरोधात संघाने मानहानीचा दावा दाखल केला. याच प्रकरणाची सुनावणी शिवडी कोर्टात होती. त्यावेळी राहुल गांधी यांनी आपण दोषी नसल्याचं ठामपणे सांगितलं. १५ हजाराच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन देण्यात आला. संघाविरोधात जे आरोप केले त्यावर आपण ठाम असल्याचंही राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं आहे.

 

यानंतर जेव्हा राहुल गांधी कोर्टाबाहेर आले तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शेतकरी आत्महत्या, रोजगार, तरूणांचे प्रश्न या विषयांवर लढाई सुरू राहणार असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तसंच मागील पाच वर्षांमध्ये ज्या ताकदीने लढलो त्याच्या दसपट ताकदीने पुढची लढाई सुरू राहिल असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी हे अत्यंत आक्रमकपणे बोलत होते. ते जेव्हा मुंबई विमानतळावर आले तेव्हा राहुल तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है अशा घोषणाही काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या.

माझी लढाई ही विचारांची लढाई आहे. ही लढाई मी यापुढेही लढत राहणार. अधिक तीव्र करणार असेही राहुल गांधी यांनी सांगितले. तसेच ट्विट प्रकरणात मी दोषी नाही असे त्यांनी कोर्टात सांगितले.