देशाच्या भविष्यातील ऊर्जा सुरक्षेसाठी अणुऊर्जा महत्त्वाची असून या माध्यमातून देशाला शाश्वत ऊर्जा मिळू शकते. त्यामुळे अणुऊर्जेकडे वळण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही, असे ठाम प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. तसेच जैतापूर प्रकल्पाला असलेला विरोधही आता मावळला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पात जमीन जाऊनही या प्रकल्पाचे समर्थक असलेल्या राजा पटवर्धन लिखित ‘जैतापूरचे अणुमंथन’ या पुस्तकाचे प्रकाशन चव्हाण यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. ज्यांनी प्रकल्पासाठी हालचाली केल्या, त्यांनीच प्रकल्पाला विरोध केला, अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली. जैतापूर प्रकल्पासाठी भूसंपादनाचे काम हे २००३ मध्येच झाले होते. त्या वेळी केंद्रात यूपीए सरकार नव्हते, असेही त्यांनी शिवसेनेचे नाव न घेता स्पष्ट केले. तसेच अणुऊर्जा प्रकल्पाची अपरिहार्यता लोकांसमोर आल्यानंतर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलन मावळले असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
वीजनिर्मितीसाठी परदेशातून कोळसा आणायचा असेल आणि त्यासाठी जलवाहतुकीचा पर्याय असेल तर वीज प्रकल्प उभारण्यासाठी कोकणाशिवाय कोणतेही योग्य ठिकाण नाही, याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले. उद्योगमंत्री नारायण राणे यांनी कुणाचेही नाव न घेता प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांवर टीकास्त्र सोडले.