केवळ आयुक्तांच्या परवानगीने कार्यक्रम; मरिन ड्राइव्ह येथील सार्वजनिक ठिकाणाच्या वापरावर निर्बंध

पालिकेच्या विभाग कार्यालयांमधील साहाय्यक आयुक्तांच्या परवानगीने सार्वजनिक ठिकाणी व्यावसायिक तत्त्वावर भरविण्यात येणारी विविध प्रकारची प्रदर्शने, जत्रा, यात्रा आदी निरनिराळ्या प्रकारच्या कार्यक्रमांमुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे यापुढे मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमांना बंदी घालण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. इतकेच नव्हे तर सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमाच्या आयोजनला मंजुरी देण्याचे साहाय्यक आयुक्तांना दिलेले अधिकार काढून घेण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणच्या कार्यक्रमांसाठी पालिका आयुक्तांची मंजुरी सक्तीची करण्यात आली आहे. त्याचबरोबर मरिन ड्राइव्ह येथील सार्वजनिक ठिकाणाचा वापर करण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.

मुंबईतील विविध परिसरांतील सार्वजनिक ठिकाणी निरनिराळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. झाडे, फळे, फुले, पुस्तक आदींची प्रदर्शने, विविध प्रकारच्या जत्रा, यात्रा आदींचा त्यात समावेश असतो. या कार्यक्रमांच्या निमित्ताने आयोजक बक्कळ पैसे कमवीत असतात. या कार्यक्रमांना पालिकेच्या विभाग कार्यालयांतील विविध विभागांकडून मंजुरी दिली जाते. तसेच अग्निशमन दल, वाहतूक पोलीस, स्थानिक पोलीस ठाण्याकडूनही या कार्यक्रमांना परवानगी घ्यावी लागत होती. या कार्यक्रमांना अंतिम मंजुरी देण्याचे अधिकार पालिकेच्या विभाग कार्यालयांमधील साहाय्यक आयुक्तांना बहाल करण्यात आले होते.

सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या या कार्यक्रमांमुळे आसपासच्या परिसरात राहणारे रहिवासी, पादचाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. तसेच काही ठिकाणी वाहतुकीलाही फटका बसतो. नागरिकांना होणाऱ्या त्रासाची गंभीर दखल घेऊन पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी यापुढे सार्वजनिक ठिकाणी विविध प्रकारची प्रदर्शने, जत्रा, यात्रा आदींच्या आयोजनावर बंदी घातली आहे. या कार्यक्रमांना मंजुरी देण्याचे पालिकेच्या विभाग कार्यालयांतील साहाय्यक आयुक्तांना दिलेले अधिकारही अजोय मेहता यांनी काढून घेतले आहेत. एखाद्या सार्वजनिक ठिकाणी अशा स्वरूपाचा कार्यक्रम आयोजित करणे अगदीच निकडीचे असेल तर त्यासाठी पालिका आयुक्तांची मंजुरी घेणे बंधनकारक केले आहे. या आदेशांमुळे भविष्यात पालिका आयुक्तांच्या मंजुरीशिवाय सार्वजनिक ठिकाणी कोणताही कार्यक्रम आयोजित करता येणार नाही.

मरिन ड्राइव्ह किनारपट्टीलगत ग्रॅण्ड मेडिकल, विल्सन, हिंदू, इस्लामिक आणि पारसी असे पाच जिमखाने आहेत. या पाचही मैदानांवर विविध सोहळ्यांचे आयोजन करण्यात येते. विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी येणारी मंडळी आपली वाहने घेऊन येतात. ही वाहने मैदानाबाहेरील रस्त्यावर अस्ताव्यस्त उभी करण्यात येतात. त्यामुळे मरिन ड्राइव्ह परिसरात फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे भविष्यात विवाह सोहळ्यानिमित्त येणाऱ्यांची वाहने रस्त्यावर उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे. विवाह सोहळ्याचे आयोजन होत असलेल्या मैदानावरच वाहने उभी करण्याची व्यवस्था करावी, असे निर्बंधही अजोय मेहता यांनी घातले आहेत. मरिन ड्राइव्ह परिसरात रस्त्यावर आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमुळे समुद्रकिनाऱ्याच्या सौंदर्याला बाधा पोहोचत आहे. त्यामुळे मरिन ड्राइव्ह परिसरातील सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमांना पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमांच्या आयोजनावर घातलेल्या बंदीबाबतचे पत्र अजोय मेहता यांनी पालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांतील साहाय्यक आयुक्तांना पाठविले आहे.

नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत अनेक सुंदर सार्वजनिक ठिकाणे आहेत आणि त्यांच्यावर पहिला अधिकार नागरिकांचा आहे.   – अजोय मेहता,पालिका आयुक्त