जावेद अख्तर यांच्या टीकेनंतर समाजमाध्यमांवर प्रतिक्रियांचा धुरळा

कबिरांनी कित्येक शतकांपूर्वी सांगून ठेवलं होतं की, ‘कंकड पत्थर जोड के मसजीद लिया बनाय, ता चढिम् मुल्ला बाँग दै, का बहरा हुआ खुदाय!’ म्हणजे दगड-विटा रचून मशीद बांधली आणि त्यावर उभं राहून मुल्ला जोरजोरात बांग देत आहे.. तो परमात्मा काय बहिरा आहे का?

कबिरांनी हा प्रश्न विचारून अनेक शतके गेली असली तरी आता परिस्थिती अधिकच कर्णकर्कश्श झाली आहे. मशिदींवरील कर्णे असोत की धार्मिक उत्सवात मंदिर, मंडप आणि सार्वजनिक ठिकाणी वाजणारे कर्णे असोत.. धर्मातील सूक्ष्म तत्त्वांना मागे टाकत आवाज अधिकच मोठा झाला आहे. हिंदू उत्सवांतील ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा न्यायालयात अधेमधे थडकत असतानाच मशिदींवरील कण्र्याचा मुद्दा मात्र समाजमाध्यमात रंगला आहे. गेल्या वर्षी गायक सोनू निगमने हा मुद्दा मांडला होता आणि भल्या पहाटे अजानच्या आवाजाने झोपमोड होणे आपल्याला सोसवत नसल्याचे म्हटले होते. आता कवी जावेद अख्तर यांनी या विषयाला पुन्हा एकदा तोंड फोडले आहे.

निवासी परिसरातील मशीद किंवा कोणत्याही धार्मिक स्थळांवरील कण्र्याना सोनू निगमप्रमाणेच अन्य कोणी विरोध करीत असेल, तर त्यांना माझा पाठिंबाच आहे, असे ट्वीट अख्तर यांनी केले आहे. त्यांच्या या विधानावर उलटसुलट प्रतिक्रियांचा धुरळा उडाला आहे.

गेल्या वर्षी सोनू निगमने या आवाजी भक्तीची तुलना गुंडगिरीशी केल्यानंतर जो कोणी त्याचे मुंडण करील त्याला दहा लाख रुपयांचे इनाम देण्याची घोषणा एका मौलवीने केली होती. त्यावर सोनूने स्वत:हून मुंडण करून घेतल्यावर चित्रपटसृष्टीतील काही व्यक्तींनीही त्याचे समर्थन केले होते. या वेळी अख्तर यांच्या ट्वीटवर काही विरोधी प्रतिक्रियाही उमटल्या. त्यांना प्रत्युत्तर देताना अख्तर म्हणाले की, ‘‘मै हर गलत बात के खिलाफ आवाज उठाता हूँ। मुश्कील यही है कि आप दूसरों की गलती को मान सकते है मगर अपनी नहीं।’’

मी प्रत्येक चुकीच्या गोष्टीविरुद्ध आवाज उठवतो. अडचण ही आहे की अनेकांना दुसऱ्यांचा दोष दिसतो, पण स्वत:चा नाही.    – जावेद अख्तर