कांदिवली येथील चारकोप परिसरात एका व्यापाऱ्याने कर्जाच्या डोंगरामुळे आलेल्या नैराशामुळे शुक्रवारी सकाळी पत्नी, दोन मुलींना विष पाजून नंतर स्वत: विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचे वृत्त समजताच तातडीने या चौघांनाही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच चारकोप पोलिसांनी पत्नी व मुलींच्या हत्येचा प्रयत्न केल्याबद्दल या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

चारकोपमधील सेक्टर २ मधील स्वयंसिद्ध सोसायटीमध्ये हरीश सोनी पत्नी रुपम (३५), मुलगी भूमिका (९) व कनिष्का (७) यांच्यासोबत राहात होते. घरामध्येच हरीश सोन्याचे दागिने घडविण्याचे काम करीत असे. त्याने व्यवसायासाठी मित्रांकडून कर्ज घेतले होते. परंतु नुकसान झाल्यामुळे त्याला कर्ज फेडणे अवघड बनले होते. कर्जाची रक्कम परत मिळावी म्हणून मित्र त्याला वारंवार विचारणा करीत होते. त्यामुळे हताश झालेल्या हरीशने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आणि गुरुवारी रात्री बाजारातून त्याने उंदीर मारण्याचे औषध आणले. पत्नीला वस्तुस्थिती सांगून आपल्या जिवाला धोका असल्यामुळे एकत्र आत्महत्या करावी असे त्याने तिला सांगितले. पत्नी आणि मुलींना बळजबरीने त्याने औषध दिले आणि नंतर त्यानेही ते सेवन केले.

घडल्या प्रकारामुळे घाबरलेल्या हरीशने आपल्या मित्राला फोन करून घटनेचे वृत्त सांगितले. त्यामुळे हादरलेल्या मित्राने पहाटे दोनच्या सुमारास वडिलांसह हरीशच्या घरी धाव घेतली.

शेजाऱ्यांच्या मदतीने चौघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी तिघांच्या हत्येचा प्रयत्न केल्याबद्दल हरीशविरुद्ध गुन्हा दाखल केला. सध्या या चौघांची प्रकृती स्थिर आहे.