अभिनेत्री जिया खान हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेला अभिनेता सूरज पांचोली याच्याविरोधात चालवण्यात येणाऱ्या खटल्याला दिलेली स्थगिती कायम ठेवण्यास उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. गेल्या फेब्रुवारी महिन्यात न्यायालयाने खटल्याला स्थगिती दिली होती.

जियाने आत्महत्या केलेली नाही, तर सूरजने तिची हत्या केल्याचा आरोप करीत जियाची आई राबिया खान हिने सीबीआयने या प्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्राविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सूरजने जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सीबीआयने सूरजवर आरोपपत्र दाखल केले आहे. न्या. नरेश पाटील आणि न्या. ए. ए. बदर यांच्या खंडपीठासमोर सोमवारी राबिया यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळेस न्यायालयाने खटल्याला दिलेली स्थगिती कायम ठेवण्यास नकार दिला. या वेळेस न्यायालयाने राबिया यांना धारेवर धरले. स्थानिक पोलिसांकडून योग्य तपास केला जात नाही, असा आरोप करीत तुम्ही उच्च न्यायालयात धाव घेतली, असेही सुनावले.