महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन लेणी

प्राचीन नालासोपाऱ्याला खेटूनच असल्याने प्राचीन काळातही विरार हे तत्कालीन पसंती लाभलेले ठिकाण होते, असे विधान ‘पूर्वाधा’मध्ये केले होते. जीवदानीचा किल्ला किंवा तिथे असलेली लेणी ही त्याचा ढळढळीत महत्त्वाचा पुरावा कसा ठरतात ते आपण या भागामध्ये समजून घेणार आहोत. मात्र त्यासाठी आपल्याला इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकातील परिस्थिती आणि महाराष्ट्रातील लेणींसंदर्भातील तज्ज्ञांचे म्हणणे समजून घेणे क्रमप्राप्त आहे.

Nagpur, Jyoti Amge, World's Shortest Woman, World's Shortest Woman voting, World's Shortest Woman in nagpur, lok sabha 2024, polling day, nagpur news, guinness book
जगातील सर्वात कमी उंचीच्या महिलेचे नागपुरात मतदान
Dombivli Crime News
डोंबिवली : शालेय विद्यार्थ्यांना ड्रग्ज विकणाऱ्या ६५ वर्षाच्या महिलेला अटक
uddhav thackeray and kangana
“भाजपाई कंगनाने तिचे अगाध ज्ञान पाजळून इतिहासाची…”, ठाकरे गटाचा टोला
Electoral bond, Electoral bond scam
निवडणूक रोखे घोटाळा म्हणजे ‘मोदीगेट’; स्वतंत्र आयोगातर्फे चौकशीची मागणी

सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये धर्मरख्खित अर्थात धर्मरक्षित या यवन भिक्खूला सम्राटाने अपरांत म्हणजे कोकणात त्यातही त्याच्या राजधानीचे ठिकाण असलेल्या शूर्पारक अर्थात आताच्या नालासोपाऱ्याला धर्मप्रसारार्थ पाठविल्याचा उल्लेख सापडतो. एवढेच नव्हे तर सम्राट अशोकाने बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी आग्नेय आशियामध्ये पाठविलेल्या भिक्खूंमध्ये त्याचा स्वत:चा मुलगा महिंद याचाही समावेश होता. त्याने सिंहल देशाच्या दिशेने म्हणजेच श्रीलंकेच्या दिशेने केलेल्या प्रवासाची सुरुवात शूर्पारक येथून झाली. या उल्लेखांमधून असे लक्षात येते की, त्या वेळेस शूर्पारक हे अतिमहत्त्वाचे असे बंदर होते. या शिवाय ‘पेरिप्लस ऑफ एरिथ्रिअन सी’मध्ये व इतर प्रवाशांच्या वर्णनामध्येही त्याचा उल्लेख सापडतो. फक्त इसवी सनपूर्व दुसरे शतकच नव्हे तर अगदी १८ व्या शतकापर्यंतचा इतिहास असा सांगतो की, महाराष्ट्रामध्ये प्रवेश करण्याचा पूर्वापार महामार्ग हा सागरी होता. इथे आलेले बेनेइस्रायली, पारशी, मुस्लीम आणि त्यानंतर आलेले डच, पोर्तुगीज आणि ब्रिटिश हे सर्वच्या सर्वप्रथम सागरी मार्गानचे महाराष्ट्रात प्रवेश करते झाले. महाराष्ट्र सागरी व्यापारी मार्गाने जगाशी जोडलेला होता. साहजिकच आहे की, त्यामुळे सर्वात पहिल्या लेणी खोदणारेही याच मार्गाने महाराष्ट्रात प्रवेश करते झाले. त्यातही ही घटना इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकातील असेल तर सागरी मार्ग हाच त्या वेळेस मुख्य उपलब्ध मार्ग होता.  भारतातील सर्व लेणींवरील सर्वात पहिले संशोधन हे विद्वान जेम्स फग्र्युसन, नंतर जेम्स बर्जेस आणि इतर विद्वानांचे संशोधनकार्य येते. महाराष्ट्रातील सर्वात पहिली लेणी म्हणून या सर्वानीच भाजे लेणींचा विचार केला आहे. त्यासाठी त्यांनी भाजेमध्ये सापडणारे दगडावरील मौर्यकालीन पॉलिश आणि बौद्ध धर्माच्या पहिल्या म्हणजेच हीनयान काळात लेणींमध्ये फारसे अलंकरण नसणे या दोन महत्त्वाच्या निकषांचा वापर केला आहे. त्याचप्रमाणे भाजे येथे सुरुवातीस दिसणारे कलते खांब हे देखील महत्त्वाचे प्रमाण मानले आहेत. सुरुवातीच्या काळातील शिल्पींनी त्यांना जे जसे दिसले ते तसे खोदण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे घराचे वजनभाराने कललेले खांब तसेच लेणींमध्येही प्रतिबिंबित झाले. भारतातील पहिल्या असलेल्या बाराबर लेणी आणि भाजे या दोन्हींमध्ये असे विशिष्ट साम्य आढळते. त्यामुळे भाजेच्या लेणींना राज्यातील पहिल्या खोदलेल्या लेणींचा मान पुराविदांकडून मिळाला. याशिवाय मौर्यकाळातील पॉलिश जे आपल्याला दिदारगंज यक्षीच्या बाबतीत पाहायला मिळते ते महाराष्ट्रात केवळ भाजे येथे दिसते, असे अनेक विद्वानांचे म्हणणे होते. मात्र भाजेबरोबरच ते जीवदानीच्या लेणींमध्येही पाहता येते. जीवदानीतील एका लेणीची भिंत आता टाइल्सखाली दडलेली आहे. मात्र ज्या लेणीमध्ये आज देवीची मूर्ती आहे तिथे मोकळ्या ठेवलेल्या भागामध्ये आजही ते गुळगुळीत मौर्यकालीन पॉलिश व्यवस्थित पाहता येते. याचा अर्थ इसवी सनपूर्व दुसऱ्या कालखंडात जीवदानीची लेणी खोदण्यात आली असावीत. आता हीच भाजेच्या आधीची लेणी असावीत, असा तर्क करण्यास आधार काय, या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रातील डोंगर सोडून थेट भाज्यापर्यंत पोहोचून तिथेच पहिली लेणी का खोदण्यात आली असावीत, असा प्रश्न विचारावा लागतो. या प्रश्नामध्येच उत्तराची मेख दडलेली आहे. भाजेच सर्वप्रथम का, म्हणजेच त्याच स्थळावर पहिली लेणी का, या प्रश्नाला आजवर कोणीही पुराविद मान्य किंवा समाधान होईल असे उत्तर तर्कशास्त्राच्या आधारे देऊ  शकलेला नाही. उलटपक्षी जीवदानीचीच लेणी पहिली असण्यास तार्किक कारण निश्चितच देता येते.

जीवदानी संदर्भातील तार्किक उत्तर समजून घेण्यासाठी जीवदानीच्या डोंगरावर जाऊन त्याचे भौगोलिक स्थळमाहात्म्य समजून घ्यावे लागते. जीवदानीच्या या लेणींमधून बरोबर समोरच्या बाजूस ९० अंशाच्या कोनामध्ये बोळिंजचा परिसर आजही व्यवस्थित दिसतो. या बोळिंजपासूनच प्राचीन नालासोपारा बंदरमार्गाला रीतसर सुरुवात व्हायची. त्याचे पुरातत्त्वीय पुरावे सापडलेले आहेत. खाडीमार्ग वैतरणा नदीच्या पात्रातून बोळिंजला आतमध्ये येऊन नंतर गासमार्गे नालासोपाऱ्याला समुद्रात बाहेर पडायचा. हा बडय़ा व्यापारी जहाजांसाठी एकदिशा मार्ग होता. शिवाय इथे पश्चिमेस असलेला जमिनीचा भाग ब्रेकवॉटर म्हणून काम करीत असे. त्यामुळे आत खाडीमध्ये पाणी तुलनेने संथ असे. बंदर म्हणून हे अतिशय सोयीचे होते. अगदी अलीकडे म्हणजे १९ व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत हे बंदर वापरात होते. रत्नागिरीहून १९ व्या शतकाच्या सुरुवीतीस इथे येऊन स्थायिक झालेली कुटुंबे आजही नालासोपाऱ्यातच आहेत. समृद्ध बंदर म्हणून ही कुटुंबे इथेच स्थायिक झाली.

कोणत्याही नौदलासाठी बंदराची सुरक्षा ही सर्वप्रथम असते. जलव्यापारासाठीही हीच सुरक्षा महत्त्वाची असते. म्हणून साधारणपणे कोणतेही नौदल या जागेपासून जवळचा असलेला उंच भाग निरीक्षणासाठी निवडते. मुंबईच्या बंदर सुरक्षेसाठीही अशाच ठिकाणाची निवड करण्यात आली आहे. हीच बाब नालासोपाऱ्याला लागू केली तर इथे सर्वात जवळचा उंच असलेला भाग म्हणजे जीवदानीचा डोंगर. पार पालघपर्यंतचा टापू उत्तरेस तर दक्षिणेस अगदी भाईंदपर्यंतचा टापू आजही नजरेच्या एकाच टप्प्यात पाहायला मिळतो. साहजिकच आहे म्हणून इथे निरीक्षणासाठी किल्ला अस्तित्वात आला. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वरच्या बाजूस  किल्ला आणि त्याच डोंगऱ्यात मध्यावर लेणी अशी रचना पाहायला मिळते. जीवदानीही त्याला अपवाद नाही. इथून केवळ समोरच्याच बाजूचा टापू नव्हे तर वैतरणा नदी म्हणजेच वैतरणेचा व्यापारी मार्ग आतमध्ये येतो तिथे मागच्या बाजूस कामणपर्यंत असलेला पूर्ण टापू आजही व्यवस्थित पाहता येतो. कामण दुर्ग हादेखील व्यापारी दृष्टीने महत्त्वाचा असा भाग होता.

शिवाय तार्किकदृष्टय़ा महत्त्वाची बाब म्हणजे बौद्ध धर्मासोबतच आपल्याकडे भारतात शिल्पकला येऊन पोहोचली, असे ऐतिहासिक आढाव्यात लक्षात येते. त्यामुळे बौद्धधर्मप्रसारकांसोबतच शिल्पीही महाराष्ट्रात आलेले असणार तेही शूर्पारक याच मार्गाने कारण अज्ञाताचा प्रवास हा नेहमीच ज्ञात ते अज्ञात असा होत असतो. त्यामुळे ज्ञात शूर्पारकापासून हे प्रसारक आणि शिल्पी अज्ञात महाराष्ट्रात गेले असावेत. नव्या परिसरात होणारे सुरुवातीचे प्रयोग हे प्रायोगिकच असतात. त्या अर्थाने जीवदानीच्या लेणींकडे पाहिले. तर कोणतेही अलंकरण नसलेली अशी ही प्रायोगिकच लेणी आहेत, हे व्यवस्थित निरीक्षणांती लक्षात येते. मौर्यकालीन पॉलिश नंतर लुप्त झालेले दिसते. त्यामुळे मौर्यकालीन पॉलिश असलेली ही लेणी शूर्पारकाच्या अस्तित्वामुळे सर्वप्रथम अस्तित्वात आलेली असावीत. या मौर्यकालीन पॉलिशमुळेच सुप्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ डॉ. एस. नागराजू यांनी त्यांच्या आर्किटेक्चर ऑफ वेस्टर्न इंडिया या पुस्तकामध्ये या लेणींची नोंद इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकातील अशीच केली आहे. त्यामुळेच भाजे आणि जीवदानी ही दोन्ही समकालीन असली तरी शूर्पारकशी असलेल्या संबंधांमुळे जीवदानी हीच पहिली असावीत असे ठामपणे म्हणता येऊ  शकते. तसे कोणतेही ठोस कारण भाजेच पहिली का याबाबत आजपर्यंत तरी कोणाला देता आलेले नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन लेणींचा मान अशा प्रकारे जीवदानीकडे जातो, असे ठाम विधान करता येते.

(उत्तरार्ध)

vinayak.parab@expressindia.com

@vinayakparab