आरोग्य विभागाच्या आयुक्तांचे आश्वासन

जे.जे. महानगर रक्तपेढीच्या दयनीय अवस्थेचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची तात्काळ दखल घेऊन आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. अनुपकुमार व संचालक डॉ. साधना तायडे यांनी जे.जे. महानगर रक्तपेढीला भेट दिली. तेथील दुरवस्था लक्षात घेऊन रक्तपेढीत तात्काळ सुधारणा करण्याचे आदेश दिले असल्याचे आयुक्त डॉ. अनुपकुमार यांनी सांगितले.

मुंबईला लागणाऱ्या सुमारे अडीच लाख रक्ताच्या पिशव्यांपैकी ४० हजार रक्ताच्या पिशव्यांचा पुरवठा करण्याची क्षमता असलेल्या जे.जे. महानगर रक्तपेढीच्या तिन्ही मजल्यांना वाळवीने पोखरले आहे. अनेक ठिकाणी भिंतींमधून पाण्याची गळती होत असल्यामुळे सुरक्षित रक्तपुरवठय़ाचा प्रश्न निर्माण झाला आहे. रक्तसाठवण करणाऱ्या रेफ्रिजेटरला गळती लागली असून रक्तचाचणी करणारी १२ उपकरणे बऱ्याच काळापासून बंद पडली होती. रक्त चाचणीसाठी वापरण्यात येणाऱ्या लँसेटची (सुई) मुदत संपूनही त्याचा वापर करण्यात येत होता.

या संदर्भात ‘लोकसत्ता’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर आयुक्त डॉ. अनुपकुमार व संचालक डॉ. साधना तायडे यांनी त्याची दखल घेत रक्तपेढीची सखोल तपासणी केली. त्यावेळी बऱ्याच काळापासून उपकरणे बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

दूषित रक्तपुरवठय़ाची शक्यता लक्षात घेऊन राज्य रक्तसंक्रमण परिषदेच्या संबंधित डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात येणार आहे. आमच्या भेटीत रक्तपेढीत अनेक त्रुटी आढळून आल्या. वातानुकूलित यंत्रणा, अनेक उपकरणे बंद होती. आवश्यक ती उपकरणे तात्काळ खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच वाळवीसह, गळती व अन्य कामे करण्यासही संबंधितांना सांगितले आहे. त्याचप्रमाणे भविष्यात असे प्रकार घडणार नाही, याची काळजी घेतली जाईल.     – डॉ. अनुपकुमार, आयुक्त, आरोग्य विभाग