जे.जे. रुग्णालयात आता बिल, औषधे इत्यादी ठिकाणी पैसे भरण्यासाठी रोख रक्कम घेऊन फिरण्याची आवश्यकता उरणार नाही. ऑनलाइन पैसे भरण्याची सुविधा रुग्णालयात लवकरच सुरू होणार आहे. जे.जे.मध्ये सुविधा सुरू झाल्यानंतर कामा, सेंट जॉर्ज, जीटी रुग्णालयांमध्येही ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

जे.जे. रुग्णालयात दरदिवशी सुमारे तीन हजार रुग्ण बाह्य़रुग्ण विभागात, तर ६० ते ७० रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. बाह्य़रुग्ण विभागाचे शुल्क नाममात्र असले तरी रुग्णालयीन बिल, औषधे या ठिकाणी पैसे देण्यासाठी म्हणून रुग्णाच्या नातेवाईकांना जवळ रोख रक्कम बाळगावी लागते.

रुग्णांच्या नातेवाईकांच्या सोईच्या दृष्टीने रुग्णालयात सर्व ठिकाणी ऑनलाइन पैसे भरण्याची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. काही बँकांनी यासाठी पुढाकार दर्शविला असून लवकरच त्यातील एका बँकेची नियुक्ती करण्यात येईल.

रुग्णांसोबत विद्यार्थ्यांनाही आता महाविद्यालयीन शुल्कही ऑनलाइन भरता येणार आहे. त्यामुळे धनादेश किंवा डीडीसाठी धावपळ करावी लागणार नाही, असे जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितले.