देशातील प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याच्या जुमल्याप्रमाणे आता राम मंदिर उभारणार असे भाजपाकडून वारंवार सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा देखील जुमलाच आहे का? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.


ठाकरे म्हणाले, जेव्हा आपण राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करतो तेव्हा मंदिर प्रत्यक्षात व्हायला हवे अशी आपली निश्चित भुमिका असायला हवी. अन्यथा हा मुद्दा केवळ निवडणूकांदरम्यान येतो आणि एकदा निवडणूका पार पडल्या की त्याकडे पुन्हा दुर्लक्ष केले जाते, असे व्हायला नको.

उद्धव ठाकरे यांनी देखील आता राम मंदिरावरुन राजकारण सुरु केले आहे. कारण भाजपावर टीका करताना राम मंदिराच्या मुद्द्याचा उल्लेख न चुकता करतात. त्याचप्रमाणे देशात इतरत्रही सध्या राम मंदिराचा मुद्दा चर्चेमध्ये आहे. त्यावरुन अनेक उलटसुलट प्रतिक्रियाही येत आहेत.

सध्या देशात निवडणुकांचा माहौल आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, मिझोराम आणि छत्तीसगढमध्ये निवडणुका सुरु आहेत. त्यातच आता संत समाजही सरकारने राम मंदिर लवकरात लवकर उभारावे यासाठी आग्रह करीत आहेत. राम मंदिराचे भिजत घोंगडे ठेवल्याने केंद्र सरकारवर सातत्याने टीका होत आहे.