संसदेवरील हल्ला हा मी जवळून पाहिला होता. हा हल्ला परतवून लावण्यासाठी ज्या सुरक्षा सैनिकांनी आपल्या प्राणाची बाजी लावून संसदेचे संरक्षण केले त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना आज न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.

कोण होता अफझल गुरू?
अफझल गुरू हा सुशिक्षित होता. त्याने दिल्ली विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदवी संपादन केली होती. संसद हल्ल्यात अटक झाली तेव्हा तो कमिशन एजंट म्हणून काम करीत होता. उत्तर काश्मीरमधील सोपोर या गावचा तो मूळ रहिवासी होता. त्याचे वडील हबिबउल्ला हे वाहतूक व लाकूड व्यवसायात होते.
तो तरूण असतानाच ते वारले. अफझल गुरूची इच्छा डॉक्टर होण्याची होती. त्याने १९८८ मध्ये झेलम व्हॅली मेडिकल कॉलेजात एमबीबीएससाठी प्रवेश घेतला होता पण त्याचे एमबीबीएस पूर्ण होऊ शकले नाही. दिल्लीत गुरू हा त्याचा चुलतभाऊ शौकत गुरू याच्या समवेत राहत होता. शौकतचा विवाह अफसान नवज्योत या शीख मुलीशी झाला होता. तिने नंतर इस्लाम धर्म स्वीकारला होता. गुरू याचा शेवटचा व्यवसाय हा फळांचा होता. १३ डिसेंबर २००१ रोजीच्या संसद हल्ल्यानंतर त्याला काश्मीर पोलिसांनी अटक केली होती.