उपनगरीय रेल्वेमधील गर्दी कमी करण्यासाठी विविध उपाय शोधणाऱ्या रेल्वे प्रशासनासमोर रेल्वे कार्यकर्त्यांनी एक पर्याय मांडला आहे. मुंबईकडे येताना पारसिक बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर ठाणे-वाशी मार्गाला जोडल्या जाणाऱ्या मालगाडय़ांसाठीच्या मार्गिकेवरून गर्दीच्या वेळी कल्याण-पनवेल किंवा कल्याण-वाशी सेवा सुरू करावी, अशी मागणी काही रेल्वे कार्यकर्त्यांनी पत्राद्वारे थेट रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली आहे. मात्र अशा सेवेच्या शक्यतेबाबत रेल्वे अधिकाऱ्यांनी नन्नाचा पाढा वाचण्यास सुरुवात केली आहे.
ठाणे-वाशी मार्गावर गेल्या काही वर्षांत प्रवासी संख्या प्रचंड वाढली आहे. या मार्गावरील प्रवासी कल्याण-डोंबिवली येथून मुख्य मार्गाने ठाण्यापर्यंत येतात. त्यामुळे ठाणे स्थानकात प्रचंड गर्दी होते. ही समस्या सोडवण्यासाठी कळवा-ऐरोली या दरम्यान उन्नत मार्ग बांधण्याचा ४३० कोटी रुपयांचा प्रकल्प रेल्वेने मंजूर केला आहे. मात्र तो पूर्ण होण्यास काही वर्षांचा कालावधी लागणार आहे.
पारसिक बोगद्यातून बाहेर आल्यानंतर मुकुंद कंपनीकडे जाणारा एक रेल्वेमार्ग सध्या अस्तित्वात आहे. हा रेल्वेमार्ग पुढे ठाणे-वाशी मार्गाला मिळतो. रात्रीच्या वेळी या मार्गावरून मालगाडय़ांची वाहतूक होते. हा मार्ग सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी उपनगरीय वाहतुकीसाठी वापरावा, अशी मागणी रेल्वे कार्यकर्ते विजय गोखले आणि प्रवासी संघटनांचे पदाधिकारी बबन लोहोकरे आणि अनिल जोशीराव यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या मार्गावरून कल्याण-पनवेल आणि कल्याण-वाशी यांदरम्यान गर्दीच्या वेळेत चार-चार सेवा चालवल्यास प्रवाशांना मोठय़ा प्रमाणात दिलासा मिळेल, असे या पत्रात म्हटले आहे. याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांना विचारले असता हा मार्ग केवळ मालगाडय़ांच्या वाहतुकीसाठी योग्य असल्याचे सांगण्यात आले. या मार्गावरील वळण जादा धोकादायक आहे. त्याचप्रमाणे या मार्गाच्या दोन्ही बाजूंनी बैठी घरे व झोपडय़ा आहेत. उपनगरीय वाहतूक सुरू झाल्यास ते प्रवाशांसाठी व येथील रहिवाशांसाठीही धोकादायक ठरू शकते, असा समस्यांचा पाढा एका अधिकाऱ्याने वाचून दाखवला. मात्र, कोणताही मोठा प्रकल्प उभारण्यापेक्षा या समस्या सोडवणे सोपे असून त्यामुळे प्रवाशांना प्रचंड दिलासा मिळेल. परिणामी, रेल्वे अधिकाऱ्यांनी नन्नाचा पाढा न वाचता या सूचनेचा गांभीर्याने विचार करावा, असेही या कार्यकर्त्यांनी पत्रात म्हटले आहे.