बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि तिची बहिण रंगोली चंडेल या दोन्ही पुन्हा एकदा अडचणीत आल्या आहेत. सोशल मीडियात जातीय तणाव निर्माण करणारे वक्तव्य केल्यामुळे मुंबई पोलिसांनी त्यांना समन्स बजावले आहे. पोलिसांनी समन्सद्वारे या दोघींना २३-२४ नोव्हेंबर रोजी बांद्रा पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबईच्या बांद्र्याच्या महानगर दंडाधिकारी कोर्टाच्या आदेशानंतर या दोघींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासाठी पोलिसांनी बुधवारी या दोघींना समन्स बजावून याबाबत सूचना दिली. सोशल मीडियावर दोन गटांमध्ये जतीय तणाव निर्माण होईल अस वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला मुंबई पोलिसांनी कंगना आणि रंगोली यांच्याविरोधात ताजं समन्स बजाव पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, या दोघींनी आपल्या भावाच्या लग्नकार्यात व्यस्त असल्याचे सांगत चौकशीसाठी गैरहजर राहिल्या होत्या.

मुनव्वरली साहिल ए. सय्यद यांनी या दोघींविरोधत भादंवि १२४ अ नुसार देशद्रोहाची तक्रार दाखल केली होती. सय्यद हे बॉलिवूडमधील कास्टिग डिरेक्टर आणि फिटनेस ट्रेनर आहेत. कंगना आणि तिची बहिण रंगोली या चित्रपटसृष्टीची बदनामी करीत असल्याचा त्यांनी आरोप केला होता. या दोघी सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीरपणे या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची वाईट प्रतिमा रंगवत आहेत. यासाठी त्या घराणेशाही, ड्रग्ज अॅडिक्शन, जातीय विद्वेष यांचा आधार घेत आहेत. त्याचबरोबर विविध समाजातील कलाकारांमध्ये तणाव निर्माण करण्याचं काम करत या कलाकारांना खूनी संबोधत त्यांच्या धर्मांचाही कंगना आणि रंगोली अपमान करीत आहेत, असा आरोप सय्यद यांनी तक्रारीत केला आहे.