मुंबईतील मंत्रालयात काही दिवसांपूर्वी बॉम्ब ठेवल्याच्या अफवेची घटना ताजी असतानाच उडाली कुलाब्यातील ताज हॉटेलमध्ये दोन मास्कधारी व्यक्ती बंदुकीसह घुसले असल्याच्या फोनने दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. फोननंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आणि घटनास्थळाची पाहणी करण्यास पोहोचल्या. मुंबई पोलिसांचे बॉम्बशोध पथकाकडून घटनास्थळाची पाहाणी केली गेल्यानंतर ही अफवा असल्याचं समोर आलं आहे.

पोलिसांनी यानंतर तपास करण्यास सुरुवात केली आणि त्या फोन कॉलबाबत माहिती मिळवली. त्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. धमकीचा फोन कॉल हा पश्चिम महाराष्ट्रातील कराडमधून आल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. १५ वर्षाच्या मुलाने हा फोन कॉल केल्याचे तपासात उघड झाले आहे.

कुलाबा येथील हॉटेल ताज येथे दोन मास्कधारी व्यक्ती बंदुकीसह घुसले असल्याच्या फोन १५ वर्षीय मुलाने केला होता. मुलाने रिसेप्शनिस्टला फोन करुन सांगितले की, एके -४७ घेऊन दोन माणसे हॉटेलच्या मागील दरवाजातून दहशतवादी हल्ला करण्यासाठी आत येतील. त्यानंतर रिसेप्शनिस्टने ताबडतोब हॉटेल सुरक्षा आणि कुलाबा पोलिसांना याबाबत माहिती दिली.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पोलिसांना तपासात हा फोन कराड येथून केला असल्याची माहिती मिळाली. “नववीच्या विद्यार्थ्याने त्याच्या वडिलांच्या मोबाईलवरून फोन केला” असे पोलिसांनी सांगितले. “आमची टीम त्या मुलाचा आणि वडिलांचा जबाब नोंदवत आहेत आणि काय कारवाई करता येईल ते पाहू, “असे एका आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले.

“आम्ही आज सकाळी फोन आल्यावर लगेचच अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. तपास अधिकाऱ्यांनी ही अफवा असल्याचे सांगितले. आमच्या सुरक्षा टीमने सुनिश्चित केले आहे की सर्व पाहुणे आणि सहकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सर्व प्रोटोकॉल आणि मार्गदर्शक तत्त्वे पाळली जात आहेत’’ असे हॉटेल ताजने सांगितले.

दरम्यान, ही अफवा जरी असली तरी फोननंतर पोलिसांनी तात्काळ हालचाली करत संपूर्ण परिसर निर्मनुष्य केला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काळजी घेतली गेली. नोव्हेंबर २००८ मध्ये दहशतवाद्यांनी हॉटेल ताजवर हल्ला चढवला होता. या हल्ल्यात शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला होता. सध्या ताज हॉटेल करोना रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांसाठी खुलं आहे. या हॉटेलच्या किचनमध्ये तयार केलेलं जेवण मुंबईतील अनेक रुग्णालयात पोहोचवलं जात आहे.