कर्नाटकातील राजकीय नाटयाचा खेळ आता मुंबईत सुरु झाला आहे. काँग्रेस नेते आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री डी.के.शिवकुमार सरकार वाचवण्यासाठी आपल्यापरीने पूर्ण प्रयत्न करत आहेत. मुंबईत दाखल झालेल्या शिवकुमार यांनी पवईच्या रेनायसन्स हॉटेलमध्ये बुकिंग केले होते. पण त्यांचे बुकिंग आता हॉटेलकडून रद्द करण्यात आले आहे. याच हॉटेलमध्ये काँग्रेस-जेडीएसचे बंडखोर आमदार थांबले आहेत.

रेनायसन्स हॉटेलकडून त्यांचे बुकिंग रद्द करण्यात आल्यानंतर शिवकुमार यांनी मी काही दहशतवादी नाही अशी प्रतिक्रिया दिली. काही इमर्जन्सी कारणांमुळे बुकिंग रद्द करण्यात येत असल्याचे हॉटेलने शिवकुमार यांना पाठवलेल्या ई-मेल मध्ये म्हटले आहे. मी फक्त नागरिक आहे मंत्री नाही. मी दहशतवादी नाही. हे सर्व राजकारण आहे असे शिवकुमार यांनी म्हटले आहे.

शिवकुमार यांना बंडखोर आमदारांची भेट घेण्यापासून रोखण्यात आले. दरम्यान रेनायसन्स हॉटेल असलेल्या पवईमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. पवई पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे कलम लागू असेल. पवईत चार पेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यावर बंदी आहे. शांतता भंग होऊ नये म्हणून ९ ते १२ जुलैसाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे.